Gold-Silver Prices: केंद्र सरकारने मौल्यवान धातूंवरील आयात शुल्कात मोठी वाढ केल्यानंतर बुधवारी देशांतर्गत बाजारात सोन्या-चांदीच्या दरांनी विक्रमी झेप घेतली. दिल्ली सराफा बाजारात सोने तब्बल ८,५५० रुपयांनी महागून प्रति १० ग्रॅम १ लाख ६५ हजार रुपयांच्या पुढे गेले, तर चांदीच्या दरात प्रति किलो २०,५०० रुपयांची वाढ झाली. अखिल भारतीय सराफा संघटनेनुसार, ९९.९ टक्के शुद्धतेच्या सोन्याचा भाव १,५६,८०० रुपयांवरून ८,५५० रुपयांनी वाढून १,६५,३५० रुपये प्रति १० ग्रॅम (सर्व करांसह) झाला. चांदीचा दरही २,७७,००० रुपयांवरून २,९७,५०० रुपये प्रति किलोवर पोहोचला. प्लॅटिनमवरील शुल्कही वाढले – (Gold-Silver Prices) पश्चिम आशियातील तणावामुळे वाढलेल्या आयात बिलाच्या पार्श्वभूमीवर अनावश्यक आयात रोखण्यासाठी केंद्र सरकारने सोन्या-चांदीवरील आयात शुल्क ६ टक्क्यांवरून थेट १५ टक्क्यांपर्यंत वाढविले आहे. प्लॅटिनमवरील शुल्कही ६.४ टक्क्यांवरून १५.४ टक्क्यांपर्यंत करण्यात आले आहे. सोन्या-चांदीच्या संबंधित वस्तूंवरील शुल्कातही बदल करण्यात आले असून हे नवे दर बुधवारपासून लागू झाले आहेत. हेही वाचा – रुपया आणखी पातळ झाला; डॉलरच्या तुलनेत 95.80 च्या विक्रमी नीचांकी पातळीवर; 95.67 वर स्थिरावला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सोन्याच्या खरेदीवर नियंत्रण ठेवण्याचे तसेच काटकसरीचे आवाहन केल्यानंतर सरकारने हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे. भारताचा आयात खर्च आणि परकीय चलनावरील ताण कमी करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. दरम्यान, रुपयाच्या घसरणीमुळेही मौल्यवान धातूंच्या किमती वाढल्याचे विश्लेषकांनी सांगितले. डॉलरच्या तुलनेत रुपया ९५.८० या विक्रमी नीचांकी पातळीपर्यंत घसरल्याने सोन्या-चांदीच्या आयातीचा खर्च वाढला आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती आणि परकीय चलन बाहेर जाण्याच्या भीतीमुळे रुपयावर दबाव कायम आहे. हेही वाचा – सलग चार दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजार सावरला; सेन्सेक्स-निफ्टी किरकोळ वाढीसह बंद तज्ज्ञांचे मत – (Gold-Silver Prices) जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे कमोडिटी संशोधन प्रमुख हरीश व्ही यांनी सांगितले की, आयात शुल्कवाढीमुळे स्थानिक बाजारातील दर वाढतील आणि काही काळासाठी प्रत्यक्ष मागणी कमी होऊ शकते. मात्र जागतिक अनिश्चितता आणि रुपयावरील दबावाच्या काळात सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून सोन्याचे आकर्षण कायम राहील. Gold-Silver Prices: आयात शुल्कवाढीचा मोठा फटका; सोने 8550 रुपयांनी तर चांदी 20500 रुपयांनी महाग रत्ने आणि दागिने निर्यात प्रोत्साहन परिषदेने मात्र इशारा देताना सांगितले की, आयात शुल्कवाढीमुळे आयात कमी होत नाही; उलट बाजारातील दर आणखी वाढतात. दागिने विक्रेत्यांनीही चालू खात्यातील तूट कमी करण्यासाठी शुल्कवाढीऐवजी आयातीवर परिमाणात्मक निर्बंध आणण्याची मागणी केली. आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूडचा दर बुधवारी प्रति बॅरल १०७ डॉलरच्या पुढे गेला. मात्र स्पॉट गोल्ड ०.३ टक्क्यांनी घसरून ४,७००.८६ डॉलर प्रति औंसवर आले, तर चांदी १ टक्क्यांनी वाढून ८७.४५ डॉलर प्रति औंस झाली.