नवी दिल्ली – भूराजकीय तणाव, व्यापार युद्ध, इतर चलनाच्या तुलनेत कमकुवत होत असलेला डॉलर, अमेरिकेत झालेली व्याजदर कपात, अमेरिकेत होणार असलेली व्याजदर कपात या कारणामुळे सोने आणि चांदीचे गुंतवणुकीसाठीचे आकर्षण मूल्य कमालीचे वाढले आहे. अशा परिस्थितीत या दोन धातूच्या दरात दैनंदिन पातळीवर वाढ होत आहे. दिल्ली सराफात सोन्याचा दर मंगळवारी 500 रुपयांनी वाढून 1 लाख 20 हजार रुपये प्रति दहा ग्रॅम या पातळीवर गेला. कालही सोन्याचा दर दीड हजार रुपयांनी वाढला होता. दिल्ली सराफात चांदीचा दर मंगळवारी 500 रुपयांनी वाढून 1 लाख 50 हजार 500 रुपये प्रति किलो या ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर गेला. काल चांदीचा दर 7,000 रुपयांनी वाढला होता. जागतिक पातळीवर महागाई वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत महागाईपासून बचाव करण्यासाठी गुंतवणूकदार सोन्याचा आधार घेत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. त्याचबरोबर अमेरिकेचा डॉलर आणि अर्थव्यवस्था कमकुवत होत असल्यामुळे डॉलरऐवजी सोन्याचा आधार घेण्याचा प्रयत्न जगातील रिझर्व बँका करीत आहेत. त्यामुळे रिझर्व बँका मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करीत असल्यामुळे त्याचा सर्वात जास्त परिणाम सोन्याच्या किमतीवर होत असल्याचे काही विश्लेषकांनी नमूद केले. सोने आणि चांदीचे दर इतक्या उच्च पातळीवर असल्यामुळे भारतात दागिन्यासाठी सोने आणि चांदी खरेदी करणे सर्वसामान्य ग्राहकांना अवघड झाले आहे. मात्र गुंतवणूकदाराकडून सोन्याची खरेदी होत असल्याचे दिसून येत आहे. जागतिक बाजारात सोन्याचा दर 0.55 टक्क्यांनी वाढून 3,813 डॉलर आणि चांदीचा दर 1.51 टक्क्यांनी वाढून 46.22 प्रति औंस या पातळीवर गेला आहे.