नवी दिल्ली – भूराजकीय तणाव व व्यापार युद्धामुळे विविध देशाच्या रिझर्व बँका सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात करीत आहेत. अशा परिस्थितीत सोन्याचे दर वाढत आहेत. डॉलर कमकुवत होत असल्यामुळे संस्थागत गुंतवणूकदारही सोन्याची खरेदी वाढवीत आहेत, असे दिसून येत आहे. अशा परिस्थितीत सोमवारी सोन्याचा दर दीड हजार रुपयांनी वाढून 1 लाख 19 हजार 500 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. चांदीचा दर एकाच दिवसात 7,000 रुपयांनी वाढून 1लाख 50 हजार रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. जागतिक बाजारात सोन्याचा दर दोन टक्क्यांनी वाढून 3,824 डॉलर आणि चांदीचा दर दोन टक्क्यांनी वाढून 47.18 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला. जागतिक बाजारातही सोने आणि चांदी विक्रमी पातळीवर आहेत. विश्लेषकांनी सांगितले की, सोने आणि चांदीचा दर वाढण्यासाठी अनेक पूरक बाबी कारणीभूत आहेत. रशिया – युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासूनच या दोन धातूच्या दरात वाढ होण्यास सुरुवात झालेली आहे. हे युद्ध अजून थांबलेले नाही. त्यातच डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिकेच्या अध्यक्षपदावर जानेवारी महिन्यात नियुक्ती झाल्यानंतर या दोन धातूचे दर जास्त वेगाने वाढत आहे. करोनानंतर निर्माण झालेली नकारात्मक परिस्थिती अजूनही विविध देशात कायम आहे. त्यामुळे महागाई जास्त पातळीवर आहे. आता अमेरिकेच्या व्यापार शुल्कामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवरच नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत डॉलर वेगाने कमकुवत होत आहे. त्यामुळे अमेरिकन डॉलर आणि अमेरिकेच्या कर्जरोख्यावरील परतावा कमी होत आहे. अशा परिस्थितीत जागतिक संस्थागत गुंतवणूकदार अमेरिकेच्या कर्जरोख्याऐवजी सोने आणि चांदी खरेदी करीत आहेत. त्यातच औद्योगिक क्षेत्राकडून चांदीची मागणी वाढल्यामुळे सोन्यापेक्षा चांदीच्या दरात गेल्या सहा महिन्यात वेगाने वाढ झाली आहे. रिझर्व्ह बँकांकडून खरेदी – अमेरिकेचा डॉलर कमकुवत होत आहे. त्याचबरोबर अमेरिकेची अर्थव्यवस्था मंदीत जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत डॉलरवर विसंबून न राहता जास्तीत जास्त प्रमाणात सोन्याची खरेदी करण्याकडे विविध देशांच्या रिझर्व बँकांचा कल आहे. त्यामुळे या बँका मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करीत असल्यामुळे सोन्याच्या दरात जास्त प्रमाणात वाढ होत असल्याचे विश्लेषकांनी नमूद केले.