Gold-Silver : गेल्या आठवड्यात आखातातील युद्ध संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे सोने आणि चांदीचे दर काही प्रमाणात कमी झाले होते. मात्र तेथील तणाव पुन्हा वाढण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे सोने आणि चांदीच्या दरात वाढ नोंदली गेली. दिल्ली सराफात चांदीचा दर 4 हजार 300 रुपयांनी वाढून 2 लाख 57 हजार 300 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. दिल्ली सराफात सोन्याचा दर 800 रुपयांनी वाढून 1 लाख 57 हजार रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. भूराजकीय तणावाबरोबरच विविध देशात इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर महागाई वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत महागाईपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी देश- विदेशातील ग्राहक बर्याच प्रमाणात सोने आणि चांदी खरेदी करीत असल्यामुळे या दोन धातूच्या दरात वाढ नोंदली गेली आहे. जोपर्यंत आखातातील युद्ध खात्रीने संपत नाही तोपर्यंत या दोन धातूचे दर अस्थिर राहतील किंवा वाढतील असे दिसून येते. देशातील आणि परदेशातील वायदे बाजारातही या दोन धातूचे दर कमालीचे स्थिर होते. लवकरच अमेरिकेतील महागाईची आकडेवारी जाहीर होणार आहे. त्याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष आहे.