नवी दिल्ली – गेल्या आठवड्याप्रमाणे या आठवड्याची सुरुवातही सोने आणि चांदीच्या दरवाढीने झाली आहे. एचडीएफसी सिक्युरीटीज या संस्थेचे विश्लेषक सौमिल गांधी यांनी सांगितले की, पुढील आठवड्यात फेडरल रिझर्व व्याजदरात कपात करण्याची शक्यता आहे. एकूण जागतिक परिस्थिती पाहिली असता बर्याच ब्रोकरेज संस्था सोने खरेदीचा सल्ला देत आहेत. देश विदेशातील रिझर्व बँकांनीही सोन्याची खरेदी वाढविली आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात वाढ होत आहे. अमेरिकेत होणार असलेल्या व्याजदर कपातीमुळे डॉलर कमकुवत होत आहे. त्यामुळे सोन्याची मागणी वाढत आहे. विशेष म्हणजे इतर चलनाच्या तुलनेत डॉलर कमकुवत होत असला तरी रुपयाच्या तुलनेत मात्र तो वधारत आहे. दिल्ली सराफात सोन्याचा दर तब्बल 3,040 रुपयांनी वाढून 1 लाख 33 हजार 200 रुपये प्रति दहा ग्रॅम या पातळीवर गेला. चांदीचा दर तब्बल 5,800 रुपयांनी वाढून 1 लाख 77 हजार रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. गेल्या पाच दिवसापासून चांदीचा दर वाढत आहे. जागतिक बाजारात सोमवारी सोन्याचा दर 42 डॉलरने म्हणजे एक टक्क्याने वाढून 4,261 डॉलर व चांदीचा दर दोन टक्क्यांनी वाढून 57.85 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला. सोन्यापेक्षा चांदीचा दर गेल्या 11 महिन्यात जास्त गतीने वाढला असून या कालावधीत चांदीचा दर शंभर टक्क्यांनी वाढला आहे. या कालावधीत सोन्याचा दर केवळ 60 टक्क्यांनी वाढला आहे. अमेरिकन अर्थव्यवस्था मंदीच्या जाळ्यात अकल्यामुळे अमेरिकेला व्याजदरात कपात करावी लागणार आहे. त्यामुळे डॉलर स्वस्त होऊन सोने आणि चांदीचे दर वाढत असल्याचे सांगितले जाते. चांदीची मागणी जास्त असताना पुरवठा कमी असल्यामुळेे चांदीचा दर वाढत आहे. या धातूला औद्योगिक क्षेत्रात मागणी वाढत आहे.