नवी दिल्ली – अमेरिकेची आर्थिक परिस्थिती खराब होत असल्यामुळे आणि विविध देशांदरम्यान युद्ध रेंगाळत असल्यामुळे सोन्याचे आकर्षण मूल्य पुन्हा वाढू लागले आहे. अशा परिस्थितीत गुरुवारी सोन्याचा दर दोनशे रुपयांनी वाढून 98,650 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. विशेष म्हणजे चांदीचा दर 2,040 रुपयांनी वाढवून 1 लाख 1,240 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला आहे. अमेरिका- चीन व्यापार बोलणी यशस्वी झाल्यानंतर सोन्याचे मूल्य बरेच कमी झाले होते. मात्र नंतर अमेरिकेचे पतमानांकन कमी झाल्याची माहिती समोर आली. जागतिक शेअर बाजाराचे निर्देशांक कालपासून कमी पातळीवर बंद होत आहेत. त्यामुळे शेअर बाजारातील बरीच गुंतवणूक सोने आणि चांदीकडे वळत असल्यामुळे या दोन धातूचे दर काही प्रमाणात वागले असल्याचे विश्लेषकांनी सांगितले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात कर कपात जाहीर करणार असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर अमेरिकेच्या कर्जामध्ये आणखी तीन लाख कोटी डॉलरची वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. याचा परिणाम जागतिक शेअर बाजारावर आणि इतर बाजारावर होत असल्याचे विश्लेषकांनी सांगितले. अमेरिकेवरील कर्ज वाढणार असल्यामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवरील विश्वास कमी होऊन अमेरिकेच्या कर्जरोख्यांची मागणी कमी होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.