नवी दिल्ली – जागतिक बाजारात सोन्याचे दर विक्रमी पातळीवर गेले आहेत. त्या प्रमाणात भारतातही सोन्याचे दर वाढून विक्रमी पातळीवर आहेत. मंगळवारी सोन्याचा दर 2,650 रुपयांनी वाढून 1 लाख 40 हजार 850 रुपये प्रत्येक दहा ग्रॅम या नव्या विक्रमी पातळीवर गेला. भारतात सोने तयार होत नाही. अशा अवस्थेत भारताला सोन्याची आयात करावी लागते. जागतिक बाजारात सोन्याचे दर वाढण्याबरोबरच रुपयाचे मूल्य कमी पातळीवर असल्यामुळे भारताला सोन्याची आयात महागात पडते. महागाईपासून बचाव करण्याबरोबरच चांदीचा उपयोग सध्या आधुनिक उद्योग जगतात मोठ्या प्रमाणात केला जात आहे. त्यामुळे नागरिकाबरोबरच उद्योग क्षेत्राकडूनही चांदीची मागणी वाढत आहे. त्यातच चांदीचे उत्पादन मागणीपेक्षा गेल्या पाच वर्षापासून कमी झाल्यामुळे दरम्यानच्या काळात सोन्यापेक्षा चांदीच्या दरात जास्त प्रमाणात वाढ झाली आहे. चांदीचा दर मंगळवारी 2,750 रुपयांनी वाढून 2 लाख 17 हजार 250 रुपये प्रति किलो या विक्रमी पातळीवर गेला. त्यामुळे दागिन्यासाठी सोने खरेदी करणे मध्यमवर्गीय आणि गरिबांना अशक्य झाले आहे. अगोदर प्रतिकात्मकरीत्या लग्नासाठी सोन्याची खरेदी केली जात होती. आता तीही खरेदी थंडावण्याची शक्यता आहे. मात्र वर्षाच्या सुरुवातीला ज्यांनी सोने खरेदी केले ते गुंतवणूकदार आणि नागरिक मालामाल झाले आहेत. विविध देशांदरम्यान सुरू असलेले युद्ध व जागतिक पातळीवर वाढत असलेली महागाई या कारणामुळे एक जानेवारीपासून सोन्याच्या दारात वाढ झालेली आहे. या परिस्थितीत नजीकच्या भविष्यात कसलाही सकारात्मक बदल होणार नाही. त्यातच फेडरल रिझर्व 2026 मध्ये एकपेक्षा जास्त वेळा व्याजदर कपात करण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे महागाईपासून बचाव करण्यासाठी या दोन धातूंची खरेदी जागतिक पातळीवर गुंतवणूकदाराकडून होत असल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक सौमील गांधी यांनी सांगितले. जागतिक बाजारात सोन्याचा दर 54 डॉलर म्हणजे 1.22 टक्क्यांनी वाढून 4,498 डॉलर आणि चांदीचा दर 1.4 टक्क्यांनी वाढून 70 डॉलर प्रति औंस या विक्रमी पातळीवर विराजमान झाला आहे. सोन्यापेक्षा चांदीमुळे नफा जास्त – 31 डिसेंबर रोजी सोन्याचा दर 78950 रुपये प्रति दहा ग्रॅम होता. आतापर्यंत यात 78 टक्क्यांची म्हणजे 61,900 रुपयांची वाढ झाली आहे. 31 डिसेंबर रोजी चांदीचा दर केवळ 89,700 रुपये प्रति किलो होता. आता हा दर 142 टक्क्यांनी म्हणजे 1 लाख 27 हजार 550 रुपयांनी वाढला आहे. म्हणजे या कालावधीत चांदीने सोन्यापेक्षा जवळजवळ दुपटीने जास्त परतावा दिला आहे. ज्या गुंतवणूकदारांनी वर्षाच्या सुरुवातीला दोन धातू खरेदी केले त्यांना शेअर बाजारापेक्षा जास्त परतावा मिळाला आहे.