नवी दिल्ली – स्थानिक दागिने उत्पादकाकडून वाढलेली खरेदी, गोल्ड एक्सचेंज फंडात वाढत असलेली खरेदी आणि इतर कारणामुळे सोन्याचा दर विक्रमी पातळीवर आगेकूच करीत आहे. अखिल भारतीय सराफा संघटनेने जारी केलेल्या माहितीनुसार, बुधवारी सोन्याचा दर 700 रुपयांनी वाढून 91,950 रुपये प्रति दहा ग्रॅम या पातळीवर गेला. सोन्याचे दर वाढण्यासाठी अनेक बाबी कारणीभूत आहेत. मध्यपूर्वेतील तणाव वाढला आहे. त्याचबरोबर अमेरिकेत मंदीची शक्यता निर्माण झाल्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याचे आकर्षण वाढले आहे. जागतिक बाजारात सोन्याची मागणी वाढली असतानाच भारतात लग्नासाठी सोन्याची खरेदी कसल्याही परिस्थितीत प्रतिकात्मकरीत्या तरी केली जाते. त्यामुळे भारतात सोन्याचे दर एवढ्या उच्च पातळीवर असून वाढत आहेत. दिल्ली सराफात चांदीचा दर एक हजार रुपयांनी वाढून 1 लाख 3,500रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. व्यापार युद्ध आणि जागतिक अस्थितता या कारणामुळे देशातील आणि परदेशातील वायदे बाजारातही सोन्याचे दर वाढत आहेत. जागतिक स्पॉट मार्केटमध्ये सोन्याचा दर 3,039 डॉलर व वायदे बाजारात 3,052 डॉलर प्रति औंस या पातळीपर्यंत गेला आहे. विश्लेषकांनी सांगितले की, डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापार युद्ध सुरू करून करोना सारखी परिस्थिती निर्माण केली आहे. अशा परिस्थितीत विविध रिझर्व बँका सोने खरेदी करीत आहेत. त्यामुळे सोन्याचे दर आणखी वाढत आहेत. दरम्यान गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंडात फेब्रुवारी महिन्यामध्ये 9.4 अब्ज डॉलरच्या म्हणजे 100 टन सोन्याची खरेदी झाली आहे. सध्याच्या परिस्थितीत अमेरिकेची रिझर्व बँक कसे पतधोरण जाहीर करते याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. हे पद धोरण लवकरच जाहीर होणार आहे. एकूण परिस्थिती अशीच राहिली तर 2025 च्या अखेरीस जागतिक बाजारात सोन्याचा दर सध्याच्या 3,000 डॉलरवरून 4000 डॉलर प्रति औंसापर्यंत वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही असे काही विश्लेषक बोलून दाखवीत आहेत. मात्र जर परिस्थिती सुधारली तर सोने माघार घेऊ शकते.