Gold-Silver Rates – भारत- पाकिस्तान मधील तणाव कमी झाल्यानंतर आणि अमेरिका – चीन व्यापार बोलणी यशस्वी झाल्यानंतर सोमवारी सोने आणि चांदीच्या दरात बरीच घट झाली होती. मात्र दीर्घ पल्ल्याचा विचार करणार्या गुंतवणूकदारांनी सोने खरेदी वाढविल्यामुळे मंगलवारी सोन्याच्या दरात वाढ नोंद केली. इस्त्रायली सैन्याने हौथी येथील दहशतवादाच्या तळावर हल्ले केल्यामुळेही काही प्रमाणात सोन्याची खरेदी वाढली. दिल्ली सराफात सोन्याचा दर 950 रुपयांनी वाढून 97,500 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तर चांदीचा दर 250 रुपयांनी कमी होऊन 99,450 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. दरम्यान सध्या सोन्याचे दर बर्याच उच्च पातळीवर आहेत. त्याचबरोबर जगात व्यापार युद्धासह अनेक घटना घडत आहेत. इतर बाजाराबरोबरच सोने आणि चांदीच्या बाजारावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत या दोन धातूचे दर अस्थिर राहू शकतात, असे विश्लेषकांनी बोलून दाखवले. अमेरिका आणि चीनदरम्यान व्यापार बोलणी यशस्वी झाली आहे. भारत आणि अमेरिकेदरम्यान ही व्यापार बोलणी चालू आहे. अशा परिस्थितीत शेअर बाजारासाठी पूरक तर धातू बाजारासाठी काही प्रमाणात नकारात्मक वातावरण तयार झाले आहे. अमेरिकेच्या महागाईची आकडेवारी लवकरच जाहीर होणार आहे. त्याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष आहे. जर महागाई वाढली तर व्याजदर कमी होऊन सोन्याचे दर वाढू शकतात.