नवी दिल्ली – डॉलर बळकट होत असल्यामुळे त्याचा चलन बाजार, शेअर बाजाराबरोबर सोने आणि चांदीच्या दरावरही परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. सोमवारी दिल्ली सराफात सोने आणि चांदीच्या दरात बरीच घट नोंदी केली. दिल्ली सराफात सोन्याचा दर 700 रुपयांनी कमी होऊन 1 लाख 25 हजार 400 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर 1 हजार रुपयांनी कमी होऊन 1 लाख 55 हजार रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. काही विश्लेषकांनी सांगितले, सकाळपासून रुपयाचा दर वधारत होता. त्यामुळे काही प्रमाणात सोन्याच्या दरावर परिणाम झाला. गेल्या दोन आठवड्यापासून विविध कारणामुळे डॉलर वधारत आहे. सोने व चांदीचे गुंतवणूक म्हणून आकर्षण मूल्य कमी झाले असल्याचे जागतिक गुंतवणूकदारांना वाटत आहे. अशा परिस्थितीत जागतिक पातळीवर सोने आणि चांदीचे दर कमी होत आहेत. त्या प्रमाणात देशातही सोने आणि चांदीचे दर कमी होत आहेत. जागतिक बाजारात सोन्याचा दर कमी होऊन 4,064 डॉलर प्रति औंस झाला. तयार चांदीचा दर 0.12 टक्क्यांनी कमी होऊन 50 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला. परदेशातील वायदे बाजारात या दोन धातूचे दर अस्थिर आहेत. रशिया- युक्रेन युद्ध, अमेरिकेचे व्यापार धोरण इत्यादी कारणाचा या दोन धातूच्या दरावर गेल्या एक वर्षापासून बराच परिणाम झालेला आहे. हे दोन्ही प्रश्न अजून सुटलेले नाहीत. त्यामुळे या दोन घडामोडीकडे गुंतवणूकदारांचे लक्ष राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. दरम्यान लग्नसराईच्या काळामध्ये या दोन धातूचे जर कमी होत असल्यामुळे भारतातील मध्यमवर्गाला काही प्रमाणात दिलासा मिळाला असल्याचे व्यापार्यांनी सांगितले. त्यामुळे दागिने खरेदीमध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.