Gold Silver Rates 25 April – मध्यपूर्वेतील तणाव कमी झाल्यामुळे आता शेअर बाजाराचे निर्देशांक वाढत आहेत तर सोने आणि चांदीचे दर अस्थिर झाले आहेत. काल सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली होती. मात्र त्यापूर्वी दोन दिवस दर मोठ्या प्रमाणात कोसळले होते. गुरुवारी सोन्याचा दर 110 रुपयांनी कमी होऊन 72,500 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तर तयार चांदीचा दर 350 रुपयांनी वाढून 84,100 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. मध्य पूर्वेतील वातावरण खराब झाले नाही तर सोने आणि चांदीच्या दरामध्ये आणखी काही प्रमाणात करेक्शन होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. जागतिक बाजारात सोन्याचा दर तीन डॉलरने कमी होऊन 2,319 डॉलर प्रति औंस व चांदीचा दर काही प्रमाणात वाढून 27.20 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला होता. आता गुंतवणूकदारांचे लक्ष अमेरिकेच्या पत धोरणाकडे लागले आहे. जोपर्यंत व्याजदर जास्त पातळीवर असणार आहेत तोपर्यंत या दोन धातूचे दर अस्थिर राहण्याची शक्यता जास्त असल्याचे एलकेपी सिक्युरिटीज या संस्थेचे उपाध्यक्ष जतीन त्रिवेदी यांनी सांगितले.