नवी दिल्ली – रशिया -युक्रेन युद्ध, इस्त्रायल- हमास युद्ध आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेले व्यापार युद्ध या कारणामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने आणि चांदीची खरेदी देशात आणि परदेशात वाढली आहे. अशा परिस्थितीत दिल्ली सराफात चांदीचा दर एक लाख रुपयापेक्षा जास्त झाला आहे. तर सोन्याचा दर नव्या विक्रमी पातळीवर गेला आहे. दिल्ली सराफात चांदीचा दर 700 रुपयांनी वाढून 1 लाख 300 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. त्याचबरोबर दिल्ली सराफात सोन्याचा दर पन्नास रुपयांनी वाढून 89,450 रुपये प्रति दहा ग्रॅम या पातळीवर गेला असल्याची माहिती अखिल भारतीय सराफा संघटनेने जारी केली आहे. सोने तेजीत राहण्याची शक्यता एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक सौमील गांधी यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापार युद्धाची केवळ घोषणा केलेली नाही तर विविध देशावरील विविध वस्तूवरील आयात शुल्क जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याचे आकर्षण वाढले आहे. त्यामुळे एकीकडे सोने खरेदी वाढली असताना गुंतवणूकदार नफा काढून घेणे टाळत आहेत. कारण आगामी काळात सोन्याच्या दरत वाढ होण्याची शक्यता या गुंतवणूकदारांना वाटत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध सुरू केल्याबद्दल युक्रेनवर टीका केल्यामुळे आता या युद्धाला वेगळेच वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांची नवी घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढील महिन्यात किंवा त्यापूर्वी लाकूड, वाहन, सेबी कंडक्टर आणि औषधाच्या आयातीवर आयात शुल्क वाढविण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. यामुळे जागतिक व्यापारावर परिणाम होणार आहे. अमेरिकेला होणारी निर्यात महागणार आहे. त्याचबरोबर विविध देशांना इतर बाजारपेठा शोधाव्या लागणार आहेत. त्याचा परिणाम चलन आणि इतर बाजारावर होत आहे. ट्रम्प यांच्या घोषणेनंतर विविध देश अमेरिकेसंदर्भात आपले निर्णय जाहीर करून जागतिक व्यापार युद्ध सुरू होण्याची भीती गुंतवणूकदारांना वाटत आहे.