जागतिक तणावामुळे सोन्यातील गुंतवणूक वाढू लागली नवी दिल्ली – अमेरिकेने युक्रेनला रशिया विरोधात दूर पल्ल्यावर मारा करणारी क्षेपणास्त्रे वापरण्याचा अधिकार दिला आहे. त्यानंतर रशियाने जर रशियाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होऊ लागला तर अणूअस्त्रे वापरण्याची शक्यता खुली केली आहे. यामुळे कालपासून जागतिक तणावात वाढ झाली आहे. परिणामी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने आणि चांदीचे मूल्य वाढत आहे. कालच्या प्रमाणे आजही यामुळे सोने आणि चांदीच्या दरात बरीच वाढ झाली. दिल्ली सराफात सोन्याचा दर 600 रुपयांनी वाढवून 78,050 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. दिल्ली सराफात तयार चांदीचा दर दीड हजार रुपयांनी वाढून 93,500 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. जागतीक व भारतीय वायदे बाजारात सोने आणि चांदीचे दर वाढत आहेत. जागतीक वायदे बाजारात सोन्याचा दर 19 डॉलरने म्हणजे 0.75 टक्क्यांनी वाढून 2,634 डॉलर व चांदीचा दर 0.19 टक्क्यांनी वाढून 31.47 डॉलर प्रति औंसावर गेला. याचा अर्थ मध्यम ते लघु पडल्ल्यात या दोन धातूचे वर उच्च पातळीवर राहण्याची शक्यता आहे. एलकेपी सिक्युरिटीज ज्या संस्थेचे विश्लेषक जतनि त्रिवेदी यांनी अणू युद्धाच्या धमक्यात दिल्या घेतल्या जात असल्यामुळे जागतिक पातळीवर तणाव निर्माण झाला असल्याचे सांगितले. अशा परिस्थितीत अपेक्षेप्रमाणे सोने आणि चांदीची खरेदी जास्त होत असते. एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक सौमिल गांधी यांनी सांगितले की, रशिया – युक्रेन तणावामुळे डॉलर बळकट होत असून अमेरिकेच्या कर्जरोख्यावरील परतावा वाढत आहे. त्यातच अमेरिका कमी व्याजदर कपात करणार आहे. अशा परिस्थितीत सोने आणि चांदीचे दर वाढत राहण्याची शक्यता आहे. दरम्यान गोल्डमॅन सॅक्स या संस्थेने म्हटले आहे की, एकूण परिस्थिती पाहता डिसेंबरपर्यंत सोन्याचा दर तीन हजार डॉलर प्रति औंसापर्यंत जाऊ शकतो. कारण अनिश्चित परिस्थितीमुळे गुंतवणूकदारानीच नाही तर रिझर्व बँकांनी सोने खरेदी वाढविली आहे.