नवी दिल्ली – देशात आणि परदेशात गुंतवणूकदार विक्री करून नफा काढून घेत असल्यामुळे सोन्याच्या दरात बरीच घट नोंदली गेली. दिल्ली सराफात सोन्याचा दर 1,150 रुपयांनी कमी होऊन 78,350 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. चांदीचा दर मात्र माफक म्हणजे तीनशे रुपयांनी कमी होऊन 92,500 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जागतिक व्यापाराबाबत काय भूमिका घेतात याचे भाकीत करणे अवघड झाले आहे. त्यामुळे डॉलरचे मूल्य कसे वाटचाल करेल याबाबत गुंतवणूकदारांना शंका आहेत. अशा परिस्थितीत सोन्याची विक्री करून नका काढून घेतला जात आहे. पुढील आठवड्यात अमेरिकेचे पतधोरण जाहीर होणार आहे. त्याबाबत गुंतवणूकदार संवेदनाशील आहेत असे एलकेपी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक जतीन त्रिवेदी यांनी सांगितले. वायदे बाजारात मात्र सोन्याचा दर 2.70 डॉलरने वाढून 2,678 डॉलर प्रति औंस झाला. तर चांदीचा दर 0.26 टक्क्यांनी वाढून 31.11 डॉलर प्रति औंस झाला. सरलेल्या वर्षात सोन्याने चांगला परतावा दिला आहे. मात्र आगामी वर्षांमध्ये सोन्याच्या दरातील वाढ मापक राहण्याची शक्यता जागतिक सुवर्ण परिषदेने व्यक्त केली आहे. विविध देशाचे विकासदर आणि महागाईचा सोन्याच्या मूल्यावर परिणाम होणार आहे. डोनाल्ड ट्रम्प कसे निर्णय घेतात यावरही सोन्याच्या दराची वाटचाल अवलंबून राहील.