नवी दिल्ली – चीनसह विविध देशांच्या रिझर्व्ह बँकांनी सोने खरेदी वाढविली आहे. अमेरिका आणखी पाव टक्क्याची व्याजदर कपात पुढील आठवड्यात करण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत जागतिक बाजारात सोन्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे सोन्याचा दर उच्च पातळीवर असूनही त्यात गुरुवारी वाढ झाली. भारतात गुंतवणूकदाराकडून आणि दागिने उत्पादकाकडून खरेदी वाढल्यामुळेही सोन्याचा दर वाढत आहे. दिल्ली सराफत सोन्याचा दर 500 रुपयांनी वाढून 80,900 रुपये प्रति दहा ग्रॅम या पातळीवर गेला. त्याचबरोबर चांदीचा दर 700 रुपयांनी वाढून 97 हजार रुपयांवर गेला. रशिया- युक्रेन युद्ध भडकत आहे. सीरयामधील सरकार पदच्युत झाल्यानंतर तेथील संघर्षाची गुंतवणूक गुंतागुंत वाढत आहे. अशा परिस्थितीत जागतिक पातळीवरील गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची खरेदी करीत असल्याचे विश्लेषकांनी सांगितले. त्यामुळे जागतिक वायदे बाजारात सोन्याचा दर 2,747 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला. चांदीच्या दरातही वाढ होत आहे. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हसेसचे विश्लेषक मानव मोदी यांनी सांगितले की, अमेरिकेच्या महागाईच्या आकडेवारीतून संमिश्र संकेत आले असले तरी डिसेंबरच्या दुसर्या पंधरवड्यात अमेरिकेची रिझर्व्ह बँक किमान पाव टक्के व्याजदर कपात करेल असे समजले जात आहे. यामुळे अमेरिकेतील महागाई वाढून सोन्याची मागणी वाढू शकते असे गुंतवणूकदारांना वाटत आहे. त्यामुळे सोन्याची खरेदी जागतिक पातळीवर वाढली आहे. अमेरिकेशिवाय युरोपातील बँकाही व्याजदर कपात करण्याची शक्यता अशा. अशा परिस्थितीत जागतिक महागाई आणखी वाढ होऊ शकते. त्यामुळे सोन्याला आधार मिळत आहे.