Gold Price Today: सोन्याने गाठला महिनाभरातील उच्चांक; 10 ग्रॅमचा भाव 1.50 लाखांच्या पुढे, चांदीतही मोठी उसळी
Gold Price Today: दिल्ली सराफा बाजारात सोन्याने 1.50 लाख रुपये प्रति 10 ग्रॅमचा टप्पा पार केला असून चांदी 2.32 लाख रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. जागतिक बाजारातील तेजी, होर्मुझ सामुद्रधुनी आणि अमेरिकेच्या आर्थिक संकेतांचा दरांवर परिणाम.

Gold Price Today: जागतिक बाजारातील तेजीचा परिणाम देशांतर्गत सराफा बाजारावरही दिसून आला असून बुधवारी सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली. दिल्ली सराफा बाजारात 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याचा भाव तब्बल 2,500 रुपयांनी वाढून 1,50,000 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला. त्यामुळे सोन्याने महिनाभरातील उच्चांक गाठला आहे. मंगळवारी हा दर 1,47,500 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.
चांदीच्या दरातही मोठी उसळी पाहायला मिळाली. एका दिवसाच्या स्थिरतेनंतर चांदीचा भाव 6,200 रुपयांनी वाढून 2,32,700 रुपये प्रति किलो झाला. सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंनी जवळपास महिनाभरातील सर्वोच्च पातळी गाठली आहे.
बाजार विश्लेषकांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीमुळे भारतीय सराफा बाजारातील दर वाढले आहेत. जागतिक बाजारात स्पॉट गोल्डचा दर 85.28 डॉलरने वाढून 4,162.76 डॉलर प्रति औंस झाला. त्याचवेळी चांदीच्या किमतीतही तीन टक्क्यांहून अधिक वाढ होऊन ती 61.35 डॉलर प्रति औंस दराने व्यवहार करत होती.
या वाढीमागे जागतिक घडामोडींचाही मोठा प्रभाव असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्याबाबत सकारात्मक संकेत मिळाल्याने जागतिक ऊर्जा पुरवठ्याबाबतची चिंता काहीशी कमी झाली. त्यामुळे महागाईवरील दबाव कमी होईल आणि अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर वाढीची शक्यता घटेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या घडामोडींमुळे सोन्याला आधार मिळाला.
मात्र, त्यानंतर येमेनमधील हूती बंडखोरांनी उत्तर लाल समुद्रात सौदी अरेबियाच्या तेलवाहू जहाजांवर हल्ल्याचा इशारा दिल्याने कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये पुन्हा वाढ झाली. त्यामुळे जागतिक बाजारातील अनिश्चितता कायम असल्याचे चित्र आहे.
आता गुंतवणूकदारांचे लक्ष अमेरिकेतील एडीपी रोजगार अहवाल, नॉन-फार्म पेरोल (NFP) आकडे आणि बेरोजगारी दराच्या आकडेवारीकडे लागले आहे. या आर्थिक संकेतांवरून फेडरल रिझर्व्हच्या आगामी व्याजदर धोरणाचा अंदाज येणार असून त्याचा थेट परिणाम सोने-चांदीच्या दरांवर होऊ शकतो.
दरम्यान, सोन्या-चांदीच्या वाढलेल्या किमतीमुळे दागिने खरेदी करणाऱ्यांच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. तर गुंतवणूकदारांसाठी जागतिक आर्थिक घडामोडी, कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकेतील आर्थिक आकडेवारी यावर बारकाईने लक्ष ठेवणे महत्त्वाचे ठरणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.





