Gold-Silver Crash: अर्थसंकल्पाच्या दिवशी सोने-चांदीचे दर कोसळले; चांदी 26,000 तर सोने 13,000 रुपयांनी स्वस्त
Gold-Silver Crash: आज सकाळी ९:२५ च्या सुमारास मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) चांदीच्या दरात तब्बल २६,२७३ रुपयांची (९%) मोठी घसरण झाली. यामुळे मार्चच्या कॉन्ट्रॅक्ट डिलिव्हरीची चांदी २,६५,६५२ रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे.

Gold-Silver Crash: केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ सादर होत असतानाच देशांतर्गत कमोडिटी मार्केटमध्ये (MCX) सोने आणि चांदीच्या किमतीत ऐतिहासिक घसरण पाहायला मिळाली आहे. बाजार उघडताच दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमती मोठ्या प्रमाणात कोसळल्याने गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
आज सकाळी ९:२५ च्या सुमारास मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) चांदीच्या दरात तब्बल २६,२७३ रुपयांची (९%) मोठी घसरण झाली. यामुळे मार्चच्या कॉन्ट्रॅक्ट डिलिव्हरीची चांदी २,६५,६५२ रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे.
दुसरीकडे, सोन्याच्या दरातही मोठी घट झाली आहे. फेब्रुवारीच्या डिलिव्हरीचे सोने १३,३४५ रुपयांनी (८.७६%) स्वस्त होऊन १,३९,००० रुपये प्रति १० ग्रॅमवर आले आहे.
घसरणीची प्रमुख कारणे –
सोन्या-चांदीच्या दरात आलेल्या या त्सुनामीमागे जागतिक आणि स्थानिक अशी दोन्ही कारणे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
ट्रम्प यांचा निर्णय आणि डॉलरचा प्रभाव: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेडरल रिझर्व्हच्या अध्यक्षपदासाठी केविन वॉर्श यांचे नाव प्रस्तावित केल्याने डॉलर इंडेक्समध्ये ०.९% ची वाढ झाली आहे. डॉलर वधारल्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहण्याचा कल कमी झाला आहे.
इंपोर्ट ड्युटी (आयात शुल्क) कपातीची शक्यता: भारतीय अर्थसंकल्पात सरकार सोन्या-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ज्वेलरी उद्योगाला चालना देण्यासाठी सरकार हे पाऊल उचलणार असल्याच्या चर्चेमुळे देशांतर्गत बाजारात मोठ्या प्रमाणावर ‘प्रॉफिट बुकिंग’ सुरू झाली आहे.
तज्ज्ञांचे मत –
सेबी (SEBI) नोंदणीकृत कमोडिटी एक्सपर्ट अनुज गुप्ता यांच्या मते, “सोन्या-चांदीच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे ज्वेलरी मार्केटवर वाईट परिणाम झाला होता. आता सरकार आयात शुल्क कमी करून मागणी वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. यामुळे येत्या काळात देशांतर्गत बाजारात किमती अजून खाली येऊ शकतात.”





