सोने वधारून नव्या उचांंकी पातळीवर ! सुरक्षित गुंतवणूक म्हणून गुंतवणूकदारांकडून खरेदी वाढली

नवी दिल्ली : व्यापार युद्ध आणि इतर कारणांमुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची खरेदी वाढत आहे. अशा परिस्थितीत सोने विक्रमी पातळीवर आगेकुच करीत आहे. बुधवारी सोन्याचा दर 1 हजार रुपयांनी वाढून 1 लाख 7 हजार रुपये प्रति दहा ग्रॅम या पातळीवर गेला. अखिल भारतीय सराफा संघटनेने जारी केलेल्या माहितीनुसार चांदीचा दर मात्र 1 लाख 26 हजार 100 रुपये प्रति किलो या पातळीवर स्थिर राहिला. सोने आणी चांदीचे दर उच्च पातळीवर असल्याबद्दल विश्लेषकाने सांगितले की, अमेरिकेत व्याजदर कपात होण्याची शक्यता आहे.
अशा परिस्थितीत डॉलर कमकुवत होण्याची शक्यता वाढली आहे. विविध देशांदरम्यानचे तणाव वाढत आहेत. अमेरिकेविरोधात रशिया, चीन आणि इतर देश एकत्र येत आहेत. अमेरिकन अर्थव्यवस्था मंदीत जाण्याची शक्यता वाढली आहे. अशा परिस्थितीत सुरक्षित गुंतवणूक म्हणून गुंतवणूकदार सोन्याचा आधार घेत आहेत. याच कारणामुळे चांदी सध्या उचांकी पातळीवर आहे. सोन्यापेक्षा चांदीचे दर जास्त वेगाने वाढले आहेत. याबाबत व्यापार्यांनी सांगितले की, गुंतवणूक म्हणून चांदी खरेदी केली जात आहे. त्याचबरोबर विविध उद्योगात चांदीचा वापर वाढत आहे. त्यातच अमेरिकेने चांदीलाही महत्त्वाचा धातू म्हणून घोषित केल्यामुळे चांदीची खरेदी वाढत आहे.
अमेरिकेच्या व्यापार युद्धामुळे चलन बाजार, शेअर बाजार आणि इतर बाजारातही अस्थिरता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत सोने आणि चांदी मात्र तेजीत राहणार आहे. ट्रम्प यांच्या आयात शुल्कावर अमेरिकेतील उच्च न्यायालयाने प्रश्नचिन्ह निर्माण केल्यामुळे या क्षेत्रातील गुंतागुंत वाढत आहे.
जागतिक बाजारातही दरवाढ
जागतिक बाजारात आज सोन्याचा दर 3,547 डॉलर प्रति औंस या उचांकी पातळीवर गेला. याबाबत विश्लेषकानी सांगितले की, मध्यम ते लघु पल्ल्यात सोने आणि चांदीचे दर जास्त पातळीवर राहण्याची शक्यता आहे. युक्रेनने रशियाच्या 17% तेल खाणीवर हल्ले केले असल्यामुळे रशियाच्या उत्पादन क्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत खनिज तेलाचे दर वाढून डॉलर कमकुवत होण्याची शक्यता आहे. यामुळेही या आठवड्यात सोन्याच्या दरात वाढ झाली.





