Gold Rates Today – जागतिक शेअर आणि चलन बाजारातील नकारात्मक घटनांमुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याचे आकर्षण वाढत आहे. अशा परिस्थितीत गेल्या सहा महिन्यापासून सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दिल्ली सराफात शुक्रवारी सोन्याचा भाव शंभर रुपयांनी वाढून 1 लाख 13 हजार 100 रुपये प्रति दहा ग्रॅम या ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर गेला. यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांना सोने खरेदी करणे अवघड झाले आहे. त्याचबरोबर मध्यमवर्गीयांना दागिने खरेदी करणे अवघड झाले असल्याचे समजले जात आहे. मात्र गुंतवणूक म्हणून सोन्याची खरेदी चालूच असल्याचे व्यापार्यांनी सांगितले. एक जानेवारीपासून सोन्याचा दर 43.25 टक्क्यांनी म्हणजे 34,150 रुपयांनी वाढला आहे. या कालावधीत इतर कोणत्याही वित्तीय साधनापेक्षा सोन्याने जास्त परतावा दिला आहे. दरम्यान चांदीचा दर 500 रुपयानी कमी होऊन 1 लाख 28 हजार रुपये प्रति किलो झाला. सोन्याच्या दरवाढीबद्दल बोलताना विश्लेषकांनी सांगितले की, जागतिक पातळीवर महागाई वाढतच आहे.करोनापासून महागाई कमी झालेली नाही. अशा परिस्थितीत महागाईपासून संरक्षण म्हणून सोन्याची खरेदी वाढली आहे. विविध देशांच्या सरकारनी घेतलेल्या कर्जातही वाढ होत आहे. त्याचा संबंधित देशाच्या तुटेवर परिणाम होत आहे. अमेरिकेचा विकासदर मंदावत चालला आहे. विविध देशांदरम्यान युद्ध चालू आहे आणि यातून मार्ग काढण्यासाठी कुणीही सकारात्मक पुढाकार घेत असल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थितीत स्वतःची गुंतवणूक सुरक्षित रहावी यासाठी सोने आणि चांदीची खरेदी वाढली आहे. जागतिक बाजारात सोन्याचा दर सध्या 3,621 डॉलर आणि चांदीचा दर 41 डॉलर प्रति औंस या विक्रमी पातळीवर आहे. नजीकच्या भविष्यात या दोन धातूचे दर जागतिक पातळीवर कमी होण्याची शक्यता नाही.