नवी दिल्ली – देश-वदेशातील किरकोळ आणि संस्थागत गुंतवणूकदारांबरोबरच रिझर्व बँका सोन्याची खरेदी वाढवीत आहेत. अशा परिस्थितीत गेल्या आहेत सहा महिन्यापासून सोन्याच्या दरात एकतर्फी वाढ होत आहे. मंगळवारी सोन्याचा दर 2,700 रुपयांनी वाढून 1 लाख 18 हजार 900 रुपये प्रति दहा ग्रॅम या नव्या विक्रमी पातळीवर गेला. सोन्याप्रमाणे चांदीच्या दरात गेल्या सहा महिन्यापासून वाढ होत आहे. मंगळवारी चांदीचा दर 3,220 रुपयांनी वाढून 1 लाख 39 हजार 600 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. चांदीच्या दरवाढीबद्दल विश्लेषकांनी सांगितले की, चांदीला गुंतवणूक म्हणून तर मागणी आहेच, त्याचबरोबर आधुनिक उद्योगात चांदीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असल्यामुळे सोन्यापेक्षा चांदीचा दर गेल्या सहा महिन्यात जास्त प्रमाणात वाढला आहे. जानेवारीपासून चांदीचा दर जवळ- जवळ 48 टक्क्यांनी वाढला असल्याच्या बाबीकडे लक्ष वेधण्यात आले. सेमीकडक्टर, इलेक्ट्रिक, वाहन, सौरऊर्जा इत्यादी क्षेत्रात चांदीचा वापर केला जातो. या क्षेत्रात घडामोडी वाढत आहेत. त्यामुळे सेमीकंडक्टरचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे जशी परिस्थिती निर्माण झाली होती तशी परिस्थिती चांदीबाबत होऊ नये, यासाठी विविध उद्योग चांदीचा साठा करून ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यामुळे चांदीच्या दरात वाढ होत असल्याचे सांगण्यात आले. जागतिक बाजारात चांदीचा दर 0.57 टक्क्यांनी वाढून 44.32 डॉलर प्रति औंस आणि सोन्याचा दर एक टक्क्याने वाढून 3,791 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला. देश -विदेशातील वायदे बाजारातही या दोन धातूंच्या दरात वाढ होत असल्यामुळे स्पॉट मार्केटमध्येही या दोन धातूचे दर वाढत असल्याचे सांगण्यात आले. दरम्यानच्या काळात भारतीय रुपयाचे मूल्य गेल्या दोन दिवसापासून वेगाने कमी होत आहे. अशा परिस्थितीत भारतात सोन्याची आयात महागात पडणार आहे. त्यामुळेही सोन्याच्या दरात वाढ होत असल्याचे व्यापार्यांनी सांगितले. मागणी वाढण्याचे कारण – विविध देशांदरम्यानच्या युद्धामुळे भूराजकीय तणाव वाढले आहेत. अशा परिस्थितीत सोन्याची मागणी वाढत असते. अमेरिकेने व्याजदरात पाव टक्का कपात केली आहे. डिसेंबरपर्यंत आणखी दोन वेळा व्याजदरात कपात होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत डॉलर आणि अमेरिकेच्या कर्जरोख्यावरील परतावा कमी होत असल्यामुळे सोन्यातील गुंतवणूक महागाईविरुद्ध लढा देण्यासाठी उपयोगी ठरते. अमेरिकेच्या राजकीय आणि व्यापार धोरणात अस्थिरता असल्यामुळे डॉलरऐवजी सोन्यावर विसंबून राहण्याकडे रिझर्व बँकांचा कल वाढला आहे. रिझर्व बँका मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करीत असल्यामुळे सोन्याच्या दारात जास्तच वाढ होत आहे.