नवी दिल्ली – काही दिवसापुर्वी रशिया- युक्रेन युध्द संपण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे सोने आणि चांदीचे दर बरेच कमी झाले होते. मात्र हे युद्ध लवकर संपुष्टात येण्याची शक्यता मंदावत चालली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारता विरोधात 50 टक्के आयात शुल्क लावले आहे. लवकरच सेमी कंडक्टर निर्यातीवर आयात शुल्क वाढविण्याची घोषणा ट्रम्प यांनी केली आहे. त्यामुळे जागतिक व्यापारात तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली. अशा परिस्थितीत सुरक्षित गुंतवणूक म्हणून पुन्हा गुंतवणूकदार सोने आणि चांदीची खरेदी करीत असल्यामुळे या दोन धातूचे दर वाढत आहेत. दिल्ली सराफात आज सोन्याचा दर 600 रुपयांनी वाढून 1 लाख 770 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा जर तीन हजार रुपयांनी वाढवून 1 लाख 18 हजार रुपये या पातळीवर गेला. एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक सौमिल गांधी यांनी सांगितले की, रशिया -युक्रेन युद्ध आणि आयात शुल्का बरोबरच ट्रम्प यांनी अमेरिकेच्या पतधोरण समितीतील एका सदस्याची हकालपट्टी केली आहे. यामुळे फेडरल रिझर्वच्या स्वतंत्र्याबाबत शंका निर्माण झाल्यामुळेही जागतिक गुंतवणूकदार सोने खरेदी करीत आहेत. त्यामुळे सोन्याच्या दरात वाढ होत आहे. अशा परिस्थितीत इतर रिझर्व बँकांबरोबर चीन आणि तुर्कीये येथील रिझर्व बँकांनी सोने खरेदी वाढविली असल्यामुळे सोने आणि चांदीच्या दरात जास्तच वाढ होत असल्याचे त्यांनी सांगितले.