नवी दिल्ली –जागतिक बाजारात सोन्याच्या दरात काही प्रमाणात घट झाली. भारतातही विक्रीचा जोर वाढल्यामुळे साने आणि चांदीच्या दरात मंगळवारी घट झाली दिली. सराफात सोन्याचा दर 500 रुपयांनी कमी होऊन 1 लाख 420 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर 1 हजार रुपयांनी कमी होऊन 1 लाख 14 हजार रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. या दोन धातूच्या दराबाबत विश्लेषकांनी सांगितले की, रशिया – युक्रेन युद्ध समाप्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिकेत युक्रेन, युरोपियन देश व अमेरिकेदरम्यान चर्चा झाली. यामुळे लवकरच युद्ध संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत सोने आणि चांदीचे सुरक्षित गुंतवणूक म्हणून आकर्षण मुल्य कमी होत आहे. यामुळे गेल्या काही दिवसापासून सोने आणि चांदीच्या दरत घट होत असल्याचे दिसून येते. दरम्यान जागतिक बाजारात सोन्याचा दर कमी होऊन 3,380 डॉलर प्रति औंस झाला. अमेरिकेचे पत धोरण लवकरच जाहीर होणार आहे. त्याकडे जागतिक गुंतवणूकदारांचे लक्ष आहे. अशा परिस्थितीत चांदीचा दर किंचित वाढून 38 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला. दरम्यान जागतिक पातळीवर अनेक अनिश्चित घटना घडत असल्यामुळे लघु ते मध्यम पल्ल्यात सोन्याचे दर जास्त पातळीवर राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तरीही अमेरिकेने सुरू केलेल्या व्यापार युद्धाचा विविध बाजाराबरोबरच सोने आणि चांदीच्या बाजारावर परिणाम अपेक्षित असल्याचे सांगितले जाते.