अमेरिका-चीन संघर्षाने सोनं झळाळलं ; १० ग्रॅमला पहिल्यांदाच ‘इतकी’ किंमत

Gold Rate । अमेरिका आणि चीनमधील सुरू असलेल्या टॅरिफ वॉरमुळे जागतिक बाजारात खळबळ उडाली आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या किमतींनी नवा उच्चांक गाठला आहे. काल मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याने प्रथमच १० ग्रॅमसाठी ९२,००० रुपये ओलांडले, तर देशांतर्गत बाजारातही सोने ९०,००० रुपयांवर स्थिर राहिले.
जागतिक अनिश्चिततेमुळे सोन्याच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. गुरुवारी MCX वर ५ जूनच्या एक्सपायरी असलेल्या सोन्याचा भाव ९२,४०० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला. नंतर किंचित घसरण होऊन तो ९२,०५० रुपयांवर स्थिरावला. सोन्याने ९२,००० चा टप्पा पार करण्याची ही पहिलीच वेळ आहे, ज्यामुळे हा आतापर्यंतचा सर्वोच्च स्तर ठरला आहे.आठवड्यात ५,४७२ रुपयांची वाढ
या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याच्या किमतीत किंचित घट दिसली होती, पण सोमवारपासून गुरुवार, १० एप्रिलपर्यंत १० ग्रॅमच्या किमतीत ५,४७२ रुपयांची वाढ झाली. सोमवारी MCX वर सोन्याचा दर ८६,९२८ रुपये होता, जो गुरुवारी ९२,४०० रुपयांवर पोहोचला.
देशांतर्गत बाजारात सोन्याचा भाव किती?
MCX वर सोन्याने विक्रम रचला असला तरी, देशांतर्गत बाजारातही किमती ९०,००० रुपयांवर कायम आहेत. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, २४ कॅरेट सोन्याचा दर ९०,१६० रुपये, २२ कॅरेटचा ८८,००० रुपये, २० कॅरेटचा ८०,२४० रुपये आणि १८ कॅरेटचा ७३,०३० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.





