Gold Purchase: सततच्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया विक्रमी नीचांकी पातळीवर घसरल्याने देशांतर्गत सराफा बाजारात सोन्याच्या दरांनी पुन्हा उसळी घेतली आहे. राजधानी दिल्लीत 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याचा भाव बुधवारच्या 1,65,350 रुपयांवरून 650 रुपयांनी वाढून 1,66,000 रुपये प्रति 10 ग्रॅम (सर्व करांसहित) झाला. मात्र, वाढलेल्या किमतींमुळे प्रत्यक्ष मागणीवर दबाव निर्माण झाला असून खरेदीचा उत्साह मंदावल्याने दरवाढ मर्यादित राहिल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे कमोडिटीज विभागाचे वरिष्ठ विश्लेषक सौमिल गांधी यांनी सांगितले. मजबूत अमेरिकी डॉलर आणि वाढत्या महागाईच्या चिंतेमुळे रुपया आणखी कमजोर झाला असून तो डॉलरच्या तुलनेत 95.73 या विक्रमी नीचांकी स्तरावर पोहोचला. अलीकडील आयात शुल्कवाढीनंतर देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किमतींमध्ये झालेल्या तीव्र वाढीमुळे गुंतवणूकदारांनी विक्रीकडे कल वाढविला आहे. परिणामी, नव्या खरेदीला विलंब होत असून आधीच मंदावलेली मागणी आणखी कमकुवत झाली आहे. या परिस्थितीचा परिणाम म्हणून भारतातील सोन्यावरील सूट (डिस्काऊंट) मोठ्या प्रमाणात वाढली असून स्पॉट मार्केटमधील सूट प्रति औंस 200 अमेरिकी डॉलरपेक्षा अधिक या विक्रमी पातळीवर पोहोचल्याचे गांधी यांनी नमूद केले. दरम्यान, चांदीच्या किमतींमध्ये सलग तीन दिवसांच्या तेजीनंतर घसरण झाली. चांदीचा भाव 900 रुपयांनी घसरून 2,96,600 रुपये प्रति किलो (सर्व करांसहित) झाला. मागील सत्रात चांदीचा दर 2,97,500 रुपये प्रति किलोवर स्थिरावला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सोन्याचा भाव किंचित वाढून 4,704.30 डॉलर प्रति औंस झाला, तर चांदीचा भाव 0.57 टक्क्यांनी घसरून 87.04 डॉलर प्रति औंसवर आला.