नवी दिल्ली – रशिया- युक्रेन युद्ध अधिकच चिघळत जाण्याची शक्यता वाढली आहे. अशा परिस्थितीत लोक सुरक्षित गुंतवणुकीचा आधार घेऊ लागले आहेत. त्यामुळे अमेरिकन डॉलर आणि अमेरिकन कर्जरोख्याबरोबरच सोन्याच्या मूल्यात वेगाने वाढ होत आहे. गुरुवारी दिल्ली सराफात सोन्याचा भाव तब्बल 1,400 रुपयांनी वाढून 79,300 रुपये प्रति दहा ग्रॅम या पातळीवर गेला. मात्र चांदीचा दर अगोदरच जास्त असल्यामुळे दिल्ली सराफात चांदीचा दर 93 हजार रुपये प्रति किलो या पातळीवर स्थिर राहिला. रशिया- युक्रेन संघर्षामुळे वायदे बाजारातही सोन्याचा दर 20 डॉलरने म्हणजे 0.74 टक्क्यांनी वाढून 2,695 डॉलर व चांदीचा दर 31.53 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला होता. युक्रेनने रशियावर लांब पल्ल्याची क्षेपणास्त्र टाकल्यानंतर आता रशियानेही युक्रेनवर लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे डागली आहेत. त्याचबरोबर ब्रिटन मधील काही संरक्षण सामग्री युक्रेनमध्ये दाखल झाली आहे. त्याचबरोबर अमेरिका युक्रेनला आणखी शस्त्र पुरवठा करण्याची शक्यता आहे.त्यामुळे जागतिक व्यापारावर परिणाम होईल. अशा परिस्थितीत सोन्याचे दर वाढत राहण्याची शक्यता आहे.