नवी दिल्ली – देशातील आणि परदेशातील शेअर निर्देशांक वाढत आहेत. त्याचबरोबर रशिया – युक्रेन दरम्यान तडजोडीची चर्चा चालू आहे. अशा परिस्थितीत सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याचे आकर्षण मूल्य किंचित कमी झाले आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यापासून सोन्याच्या दरात घट होत आहे. सोमवारी सोन्याचा दर 700 रुपयांनी कमी होऊन 90,550 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर मात्र दोनशे रुपयांनी वाढून 1 लाख 500 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला आहे. असे असले तरी जागतिक व्यापार युद्ध आणि विविध देशातील संघर्ष बर्याच प्रमाणात चालू आहेत. त्यामुळे सोन्याचे दर जास्त पातळीवर काही काळ रेंगाळत राहण्याची शक्यता आहे.