नवी दिल्ली – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह विविध सत्तर देशाविरोधात 10 ते 50 टक्क्यापर्यंत आयात शुल्क लावले आहे. याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत देश- विदेशातील गुंतवणूकदार सोने – चांदी इत्यादी सारख्या सुरक्षित गुंतवणुकीकडे वळत आहेत. अशा परिस्थितीत सोन्याची मागणी वाढल्यामुळे सोन्याचा दर एकाच दिवसात 3 हजार 600 रुपयांनी वाढून 1 लाख 2 हजार 620 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. जागतिक संकेतानुसार दिल्ली सराफात चांदीचा दरही दीड हजार रुपयांनी वाढून चांदीचा दर 1 लाख 14 हजार रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. चांदीचा दर अगोदरच उच्च पातळीवर आहे. यात आणखी वाढ होण्याची शक्यता विश्लेषक आणि व्यक्त केली अखिल भारतीय सराफा संघटनेने जारी केलेल्या माहितीनुसार गुंतवणूकदारांबरोबरच दागिने उत्पादकांनी या दोन धातूची खरेदी वाढविली आहे. अशा परिस्थितीत जागतिक बाजाराबरोबरच भारतातही या दोन धातूचे दर वाढत आहेत. ट्रम्प यांच्या धोरणामुळे केवळ अमेरिकेतच नाही तर जागतिक पातळीवरही महागाई वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत महागाईपासून बचाव करण्यासाठी गुंतवणूकदार सोने -चांदी बरोबरच क्रिप्टो करन्सी आणि इतर कमोडिटीज खरेदी करीत असल्याचे वातावरण आहे. भविष्य अनिश्चित असल्यामुळे भारतीय वायदे बाजारात ऑक्टोबरच्या बोलीच्या सोन्याचा भाव 893 रुपयांनी म्हणजे 0.88 टक्क्यांनी वाढून 1 लाख 2 हजार 155 रुपये प्रति दहा ग्रॅम या पातळीवर गेला. वायदे बाजारावर चांदीचा भाव 1.32 टक्क्यानी म्हणजे 1,503 रुपयांनी वाढवून 1 लाख 13 हजार 158 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. जागतिक बाजारात सोन्याचा दर 10 टक्क्यानी वाढवून 3,379 प्रति औंस व चांदीचा दर दीड टक्क्यानी वाढून 38.34 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला.