नवी दिल्ली: भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) परदेशांत ठेवलेला आपला सुवर्णसाठा मोठ्या वेगाने देशात परत आणत आहे. आरबीआयने आपल्या ‘परकीय चलन साठा’ (Foreign Exchange Reserves) वरील सहामाही अहवालात ही माहिती दिली आहे. अहवालानुसार, आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या सहा महिन्यांत सुमारे ६४ टन सोने मायदेशी आणले गेले आहे. देशातील साठा आता ६५ टक्क्यांवर – या महत्त्वपूर्ण ट्रान्सफरमुळे, आता केंद्रीय बँकेकडे असलेल्या एकूण सुवर्णसाठ्यापैकी ६५ टक्क्यांहून अधिक सोने देशातच जमा झाले आहे. चार वर्षांपूर्वीच्या तुलनेत हा आकडा जवळपास दुप्पट आहे. आरबीआय आपला सुवर्णसाठा सहसा बँक ऑफ इंग्लंड आणि बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट्समध्ये (BIS) ठेवते. मात्र, या सोने वापसीचे कोणतेही अधिकृत कारण आरबीआयने दिलेले नाही. रशियाच्या ‘फ्रीज’ साठ्याचा परिणाम? अर्थतज्ज्ञांच्या मते, या निर्णयामागे देशाच्या मौल्यवान धातूंच्या मालमत्तेवरील नियंत्रण वाढवण्याचा उद्देश असू शकतो. फेब्रुवारी २०२२ मध्ये युक्रेनवरील हल्ल्यानंतर अमेरिका आणि युरोपीय महासंघासह ७ देशांच्या समूहाने (G7) रशियाच्या परकीय चलनातील साठ्यावर ‘कब्जा’ (Freezing) केला होता. या घटनेनंतर आरबीआयने सोन्याला भारतात परत आणण्याच्या प्रक्रियेत लक्षणीय गती दाखवली आहे. माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियन तेल खरेदी केल्यास भारतावर ५०% शुल्क (Tariff) लावण्यापूर्वीच, अमेरिकन ट्रेझरीमध्ये (सरकारी कर्जरोखे) असलेली आरबीआयची हिस्सेदारी कमी करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. चार वर्षांत २८० टन सोन्याचे स्थलांतर – २८० टन: गेल्या चार वर्षांत आरबीआयने इतका सोने साठा देशात परत आणला आहे. ८८० टन: सप्टेंबरअखेर आरबीआयचा एकूण सोन्याचा साठा. ५७६ टन: सप्टेंबरअखेर देशांतर्गत (Domestic) साठवून ठेवलेले सोने – हा आजवरचा सर्वाधिक आकडा आहे. देशात ठेवलेल्या सोन्याचा एकूण साठ्यातील वाटा सप्टेंबर २०२२ मध्ये सुमारे ३८% होता, जो आता ६५ टक्क्यांहून अधिक झाला आहे. ‘आरबीआय’चे धोरण – अमेरिकन डॉलर आणि त्यासंबंधीच्या मालमत्तांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आरबीआय जगभरातील सोन्याच्या सर्वात मोठ्या खरेदीदारांपैकी एक आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गेल्या महिन्यात सांगितले होते की, आरबीआय आपला साठा वैविध्यपूर्ण (Diversify) करण्यासाठी अत्यंत विचारपूर्वक निर्णय घेत आहे आणि त्यावर काम करत आहे.