‘ब्लॅक मंडे’च्या दुसऱ्या दिवशीही ‘सोनं’ घसरलं; पहा ताजे दर

मुंबई – मंगळवारी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत २०० रुपयांची घसरण झाली आणि ते ९१,२५० रुपये प्रति १० ग्रॅमवर आलं. पण जागतिक बाजारात सोन्याचे भाव वाढले. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये प्रश्न निर्माण झाला आहे की, सोन्याचा भाव पुढे काय होईल आणि या चढ-उतारामागे कारण काय आहे?
देशात मागणी कमी, सोनं घसरलं
ऑल इंडिया सराफा असोसिएशननुसार, ९९.९ टक्के शुद्ध सोनं सोमवारी ९१,४५० रुपये होतं, तर मंगळवारी ते ९१,२५० रुपयांवर आलं. ९९.५ टक्के शुद्ध सोनंही ९१,००० वरून ९०,८०० रुपये झालं. स्थानिक बाजारात सोन्याला मागणी कमी असल्याने ही घसरण झाली. दुसरीकडे, चांदीच्या किमतीत थोडी वाढ झाली. गेल्या पाच दिवसांत घसरलेली चांदी २०० रुपयांनी वाढून ९२,७०० रुपये प्रति किलोवर पोहोचली. जागतिक बाजारातही चांदी ०.६९ टक्क्यांनी वाढून ३०.२९ डॉलर प्रति औंस झाली.
जागतिक बाजारात सोनं मजबूत
जागतिक बाजारात सोनं ०.८२ टक्क्यांनी वाढून ३,००७.६० डॉलर प्रति औंसवर गेलं. डॉलर इंडेक्स १०२ च्या आसपास स्थिर असल्याने सोन्याला आधार मिळाला. एलकेपी सिक्युरिटीजचे जतिन त्रिवेदी म्हणाले, “रुपयाच्या कमजोरीमुळे MCX वर सोनं वाढत आहे. चीन-अमेरिका व्यापार वादामुळे सोन्याला सुरक्षित गुंतवणूक म्हणून मागणी वाढली. कॉमॅक्सवर सोनं २,९७० डॉलरवरून ३,०१० डॉलरकडे गेलं. अमेरिकेच्या CPI डेटाची वाट पाहणारे गुंतवणूकदार सावध आहेत. सध्या MCX वर सोनं ८६,००० ते ९०,००० च्या दरम्यान राहील.”
पुढे काय?
देशात सोन्याची मागणी कमी असली तरी जागतिक बाजारात वाढणारा भाव आणि रुपयाची घसरण यामुळे सोन्याच्या किमतीत चढ-उतार राहू शकतो. गुंतवणूकदारांसाठी हा काळ सावधगिरीचा आहे!




