सोनं 98,820 रुपयांवर, चांदीने गाठला 1.12 लाखांचा टप्पा! गुंतवणूकदारांनी वाढवली मागणी

नवी दिल्ली – देशातील आणि परदेशातील गुंतवणूकदारांनी सोने आणि चांदीची मागणी वाढविली आहे. अशा परिस्थितीत सोने आणि चांदीच्या दरात बरीच वाढ नोंदली गेली. दिल्ली सराफात सोन्याचा दर आठशे रुपयांनी वाढून 98,820 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला.
तयार चांदीचा दर दिल्ली सराफात 2 हजार रुपयांनी वाढून 1 लाख 12 हजार रुपये प्रति किलो या पातळीवर गेला होता.
या दोन धातूंचे दर वाढल्याबद्दल विश्लेषकांनी सांगितले की, अमेरिकेने भारताविरोधात आयात शुल्क वाढविण्याबरोबरच रशियाचे तेल खरेदी केल्यानंतर दंड करण्याचेे जाहीर केले आहे. अशा परिस्थितीत भारताला आयात महागात पडणार असल्यामुळे रुपयाचा भाव कमी झाला. यामुळे भारताला सोन्याची आयातही महागात पडणार असल्यामुळे या दोन धातूचे दर बर्याच प्रमाणात वाढले. गुंतवणूकदाराबरोबरच भारतातील दागिने उत्पादकांनी सोन्याची खरेदी वाढविली आहे. कारण भविष्यात सोन्याचे दर वाढण्याची भीती यांना वाटते.
अमेरिकेमध्ये बेकारी वाढली आहे. तेथील आर्थिक परिस्थिती बिघडल्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नावर नकारात्मक परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत फेडरल रिझर्व पुढील महिन्यात व्याजदर कपात करण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून बरेच गुंतवणूकदार सोने आणि चांदीची खरेदी करीत असल्यामुळे या दोन धातूचे दर जागतिक बाजारात वाढत असल्याचे सांगण्यात आले.
एचडीएफसी बँकेचे वरिष्ठ विश्लेषक सोमील गांधी यांनी सांगितले की एकूणच जागतिक चलन आणि शेअर बाजारात नकारात्मक वातावरण आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदार आपल्या गुंतवणुकीतील काही भाग सोने आणि चांदीसाठी राखीव ठेवत असल्याचे दिसून येत आहे. लघु ते मध्यम पल्ल्यात सोने आणि चांदीचे दर उच्च पातळीवर राहण्याची जास्त शक्यता असल्याचे सांगितले जाते.





