नवी दिल्ली – अमेरिका आणि चीनमधील तणाव संपुष्टात येत असल्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने आणि चांदीचे आकर्षण कमी झाले आहे. या दोन धातूच्या दरात गेल्या आठवड्यापासून होत असलेली घसरण मंगळवारी चालू राहीली. दिल्ली सराफात सोन्याचा दर तब्बल 4 हजार 100 रुपयांनी कोसळून 1 लाख 21 हजार 800 रुपये प्रति दहा ग्रॅम या पातळीवर गेला. सध्या सोन्याचा दर तीन आठवड्याच्या निचांकी पातळीवर गेला आहे. असाच प्रकार चांदीबाबतही होऊन दिल्ली सराफात चांदीचा दर तब्बल 6,250 रुपयांनी कोसळून सर्व करासहित 1 लाख 51 हजार 250 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. एचडीएफसी सिक्युरिटी ज्या संस्थेचे विश्लेषक सौमील गांधी यांनी सांगितले की, तांत्रिकदृष्ट्या सोन्याचा दर जागतिक बाजारात 4,000 डॉलरपेक्षा खाली गेल्यामुळे जगभरातील गुंतवणूकदार नफेखोरी करून सोने विकत असल्याचे वातावरण आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या दरम्यान या आठवड्यात व्यापार कराराबाबत चर्चा होणार आहे. जर ही चर्चा अयशस्वी झाली तर पुन्हा सोने आणि चांदीच्या दरात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे समजले जात आहे. जागतिक बाजारात सोन्याचा दर एकाच दिवसात तब्बल 94 डॉलरने म्हणजे 2.37 टक्क्यांनी कोसळून 3,887 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला आहे. जागतिक बाजारात सोन्याचा दर कमी झाल्यामुळे त्याच प्रमाणात भारतीय बाजारात सोन्याचा दर कमी होत आहे. कारण भारतात सोने तयार होत नसल्यामुळे जागतिक पातळीवरील दराप्रमाणे भारतात सोन्याचे दर ठरतात. जागतिक बाजारात चांदीचा दर 2.85 टक्क्यांनी कोसळून 45.56 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला आहे. यावर्षी सोन्याचे दर 50 टक्क्यांनी वाढल्यामुळे पाच ते दहा टक्क्याचे करेक्शन शक्य असल्याचे सांगण्यात येते.