अमेरिकेच्या शुल्क धोरणामुळे सोने-चांदीच्या दरात वाढ

नवी दिल्ली – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विविध देशाविरोधात एकतर्फी आयात शुल्काच्या घोषणा सुरू केल्या आहेत. अशा परिस्थितीत जागतिक व्यापारावर नकारात्मक परिणाम होऊन जागतिक अर्थव्यवस्था कमकुवत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचा परिणाम चलन बाजारासह विविध बाजारावर होत आहे. त्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पुन्हा जागतिक गुंतवणूकदारांनी आपला मोर्चा सोने व चांदेकडे वळविला आहे. अशा परिस्थितीत या दोन धातूचे दर वाढत आहेत.
शुक्रवारी दिल्ली सराफात सोन्याचा दर 700 रुपयांनी वाढून 99,370 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर दीड हजार रुपयांनी वाढवून 1 लाख 5 हजार 500 रुपये या पातळीवर गेला असल्याची माहिती ऑल इंडिया सराफ असोसिएशनने दिली आहे.
एचडीएफसी सिक्युरिटीज ज्या संस्थेचे विश्लेषक सौमिल गांधी यांनी सांगितले की, विविध देशाविरोधात आयात शुल्क वाढविण्यांबरोबरच डोनाल्ड ट्रम्प तांबे, पोलाद, अॅल्युमिनियम, औषधी इत्यादीवरील आयात शुल्क वाढविण्याची भाषा करीत आहेत. संबंधित देश अशा परिस्थितीत अमेरिके विरोधात अशा प्रकारच्या उपाययोजना करण्याची शक्यता आहे. त्यामुळे जागतिक व्यापारावर परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत सोने व चांदी सुरक्षित गुंतवणूक म्हणून पुन्हा पुढे येत आहे.
या घडामोडीमुळे जागतिक बाजारात सोन्याचा दर 25 डॉलरने म्हणजे 0.75 टक्क्यांनी वाढून 3,348 डॉलर प्रती औंस या पातळीवर गेला. जागतिक बाजारात चांदीचा दरही 1.64 टक्क्यांनी वाढवून 37.61 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला. आगामी काळात ट्रम्प कशा प्रकारचे धोरण जाहीर करतात या आधारावर या धातूंचे पुढील दर ठरण्याची शक्यता विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.


