नवी दिल्ली : अमेरिकेतील 43 दिवसांचे शटडाऊन समाप्त झाले आहे. ही झीज भरून काढण्यासाठी फेडरल रिझर्व अतिरिक्त भांडवल सुलभता उपलब्ध करण्याची शक्यता आहे. तसेच अमेरिकन अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी व्याजदर कपातीची शक्यता वाढली आहे. अशा परिस्थितीत वाढणार्या महागाईमुळे जागतिक बाजारात सुरक्षित गुंतवणूक म्हणून सध्या तरी सोन्याचे आकर्षण मूल्य वाढले आहे.यामुळे सोने आणि चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. दिल्ली सराफात सोन्याचा दर 3,000 रुपयांनी वाढून 1 लाख 30 हजार रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. अमेरिकेत व्याजदर कपात होणार असल्यामुळे डॉलर वेगाने कमकुवत होत आहे. जगातील सहा मुख्य चलनाच्या तुलनेत डॉलरचे मूल्य दर्शविणारा डॉलर निर्देशांक सध्या 99.30 अंकावर आला आहे. डॉलर कमकुवत होण्याच्या प्रमाणात सोन्याचे भाव वाढत असल्याचे विश्लेषकांनी नमूद केले. सोन्यापेक्षा चांदीचे दर जास्त प्रमाणात वाढण्यास सध्या पूरक परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे दिल्ली सराफात चांदीचा दर गुरुवारी 7,700 रुपयांनी वाढून 1 लाख 69 हजार रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. जागतिक बाजारात चांदीचा दर 1.3 टक्क्यांनी वाढून 53.86 डॉलर प्रति औंसावर गेला आहे. या आठवड्यात चांदीचा दर तब्बल दहा टक्क्यांनी वाढला. अमेरिकेच्या शक्य व्याजदर कपाती बरोबरच मागणीपेक्षा चांदीचा पुरवठा कमी झाल्यामुळे चांदीचे दर गेल्या आठ महिन्यात सोन्यापेक्षा जास्त प्रमाणात वाढत आहेत. उद्योग क्षेत्राकडून चांदीची मागणी वाढत राहणार आहे. अमेरिकेने चांदीला दुर्मिळ खनिज क्षेत्रात समाविष्ट केले आहे. त्यामुळे इतर देशही चांदी जास्त प्रमाणात खरेदी करण्याचा प्रयत्न करीत आहे.