गोकुळ अष्टमी! हिंगोली जिल्ह्यातील ‘हे’ गाव करत नाही दुधाची विक्री; काय आहे परंपरा ? जाणून घ्या…

हिंगोली (शिवशंकर निरगुडे )- हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील येहळेगाव गवळी या गावातील नंदगवळी समाजबांधवांनी दुधाची विक्री न करण्याची परंपरा आजही जपली आहे. यामागे कोणतीही अख्यायिका नाही. मात्र जुन्या पिढीने सांगितले आणि नव्या पिढीने परंपरा पुढे नेली. रोज गावात पाचशे लिटर दुध उपलब्ध होते. मात्र विक्री केली जात नाही. गावात श्रीकृष्णाचे पुरातन मंदिर आहे. दरवर्षी गोकुळ अष्टमी निमित्त धार्मिक कार्यक्रम होतात.
हिंगोली जिल्ह्यात कृष्ण जन्माष्टमीनिमित्त येहळेगाव गवळ (ता. कळमनुरी) येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. येहळेगाव गवळी या गावाचे एक विशिष्ट महत्त्व म्हणजे येथे नंद गवळी समाजबांधवांतर्फे दूध न विकण्याची परंपरा आहे. गावात दोनशे ते अडीचशे गायी असूनही येथे दुधाची विक्री केली जात नाही. दूध घेण्यासाठी आलेल्यांना मोफत दूध दिले जाते. ही परंपरा ग्रामस्थांनी आजही जपलेली आहे. विशेष म्हणजे गायीची रोज पूजा केल्याशिवाय येथील शेतकरी घराबाहेरसुद्धा पडत नाहीत. येहळेगाव गवळी हे गाव तीन ते साडेतीन हजार लोकसंख्येचे गाव आहे.
गावातील बहुतांश नागरिकांचा शेती व्यवसाय आहे. प्रत्येकाकडे दुधाळ जनावरे आहेत. शेतीला जोड व्यवसाय म्हणून जनावरे पाळण्याचा प्रघात आहे. शेती व शेणखतासाठी जनावरांचाच उपयोग केला जातो. गावात कृष्णवंशीय समाजाचे नागरिक सर्वाधिक आहेत. कृष्ण हा नंद घराण्यातील असल्याचे मानले जाते. नंद घराण्यात गोरक्षण केले जाते. त्याप्रमाणे कृष्ण गोरक्षण करीत असे, मात्र नंद घराण्यात दूध विक्रीचा व्यवसाय केला जात नसल्याची परंपरा आहे.
ही परंपरा येथील नवी पिढी आजही तंतोतंत पाळते. गायीला पवित्र मानून तिची पूजा केली जाते. गायीच्या दुधापासून दही, ताक, तूप तयार केले जाते. मात्र, दुधाची विक्री केली जात नाही. गावात दूध मागण्यासाठी कोणी आल्यास त्यांना मोफत दूध दिले जाते. दूध न विकणारे गाव म्हणून जिल्ह्यात येहळेगाव गवळीची ओळख आहे. गावातील या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे जिल्हाभरात गावाची ओळख निर्माण झालेली आहे. ती गावकऱ्यांनी टिकवून ठेवली आहे.
जन्माष्टमीचा आगळा वेगळा उत्साह –
जन्माष्टमीचा सण गावात भक्तिभावाने साजरा केला जातो. तसेच या दिवशी लेक-जावायांना आमंत्रित केले जाते. गोकुळाष्टमीचा उपवास केला जातो. या दिवशी सर्व कामे बंद करून धार्मिक कार्यक्रमात सर्वजण सहभागी होतात. सोमवारी (ता. २६) कृष्ण मंदिरात जन्माष्टमीनिमित्त पूजा, अभिषेक, भजन, पाळण्याचा कार्यक्रम होतो. रात्री बारा वाजता कृष्ण जन्माचा कार्यक्रम होऊन त्यानंतर सुठवड्याचे वाटप केले जाते. मंगळवारी (ता. २७) सकाळी दहा वाजता पालखी मिरवणुक तर दुपारी कीर्तन होणार आहे. त्या नंतर महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे. पालखीत प्रत्येक घरातील पुजेतील गोकूळ जमा केले जातात.
“कृष्णा मानणारा समाज म्हणून नंद गवळी समाज ओळखला जातो. त्यामुळे नंद घराण्यात दुधाची विक्री न करण्याची पंरपरा आम्ही जपतो. गावात दूध घेण्यासाठी कोणी आल्यास त्याला कोणत्याच घरी दूध विकले जात नाही. तर कामापुरते दूध मोफत दिले जाते.
– संजय मंदाडे, सामाजिक कार्यकर्ते
“जन्माष्टमी हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आणि उत्साहाचा सण असल्याने संपूर्ण गावात आनंदी आनंद असतो. लहानापासून तर जेष्ठांपर्यंत सगळे सण उत्साहात साजरा करतात. जन्माष्टमीनिमित्त कृष्ण मंदिरात पूजा, अभिषेक, भजन, पाळण्याचा कार्यक्रम होतात.
– रामलाल यादव





