बांधावर जाऊन सभापतींनी घेतला नुकसानीचा आढावा

पंचनामे करुन नुकसान भरपाई मिळवून देणार
सातारा (प्रतिनिधी) –सोयाबीनच्या निकृष्ट बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आल्याने सातारा पंचायत समितीच्या सभापती सौ. सरिता इंदलकर यांनी कण्हेर परिसरातील शेतांवर जाऊन आढावा घेतला. शेतकऱ्यांच्या सोयाबीन बियाण्यांबाबत अडीअडचणी जाणून घेऊन भरपाई देण्याचे आश्वासन सौ. इंदलकर यांनी दिले.
खरीप हंगामासाठी पावसाच्या आधारे शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या सोयाबीन बियाणांची पेरणी केली होती. परंतु कृषी दुकानातून खरेदी केलेली सोयाबीन बियाणे न उगवल्याने शेतकऱ्यांसमोर संकट उभे राहिले होते. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाल्याने शेतकरी वर्ग त्रस्त झाला होता. सौ. सरिता इंदलकर यांनी याची दखल घेऊन वेळे-कामथी येथील शेतावर जाऊन सोयाबीन पिकाबाबत शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. नुकसानीबाबत कृषी विभागात आवश्यक त्या सूचना देवून नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून त्वरित भरपाई देऊ,असेही आश्वासन यावेळी सौ. इंदलकर यांनी दिले.
कण्हेर, चोरगेवाडी, आगुंडेवाडी, वेळेकामथी, कळंबे, साबळेवाडी, गवडी, नुने आदी गावातील शेतकऱ्यांना निकृष्ट बियाणे मिळाल्याचे समोर आले होते. यावेळी संबंधित कृषी अधिकाऱ्यांना पंचनामे करून पुढची कारवाई करण्याची सूचना सौ. इंदलकर यांनी दिली. शेतकऱ्यांना गुणवत्तायुक्त व दर्जेदार कृषी बियाणे, औषधे व खते उपलब्ध होण्यासाठी तालुकास्तरावर पथक तयार करणार आहे.
पंचायत समितीतील कृषी विभागाच्यावतीने शेतकऱ्यांना आवश्यक ते सहकार्य करून नुकसानग्रस्तांना योग्य न्याय देऊ. शेतकऱ्यांनी खरीप हंगाम चांगला घेण्यासाठी तांत्रिक पद्धतीचा अवलंब करावा, असे सौ. सरिता इंदलकर यांनी केले. यावेळी संभाजी इंदलकर, ग्रामसेवक दीपक पवार, कृषी सहाय्यक एस. जी. चव्हाण, शरद शिंदे, मच्छिंद्र चोरगे, धनाजी आगुंडे, संजय शिंदे, जमीर सय्यद, उद्धव शिंदे, बशीर सय्यद आदी उपस्थित होते.





