हरिश्चंद्र गडावर जाणं बेतलं जीवावर; रस्ता भरकटले, पावसामुळे थंडीने गारठल्याने तरुणाचा मृत्यू

अहमदनगर – सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु झाल्याने अनेकजण ट्रेकिंग करण्यासाठी बाहेर पडत आहे. मात्र ट्रेकिंगला जाणे असेच एका तरुणाच्या जीवावर बेतले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील हरिश्चंद्र गडावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या एका पर्यटकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गडावर ट्रेकिंगसाठी पुण्याहून 6 तरुण आले होते. मात्र ते रस्ता भरकटल्याने त्यातील एकाचा थंडीमुळे आणि पावसामुळे मृत्यू झाला.
नेमकं काय घडलं?
पुण्याहून सहा तरुण हरिश्चंद्रगडावर पर्यटनासाठी आले होते. १ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता या तरुणांनी तोलार खिंडीतून गडावर चढण्यास सुरुवात केली. गडावर चढत असताना धुक्यामुळे ते हरिश्चंद्रगडाच्या जंगलात रस्ता भरकटले. पाऊस सुरू झाल्याने या सहा जणांनी डोंगर कपारीचा आसरा घेत मुक्काम केला. परंतु पाऊस आणि थंडीने रात्रभर गारठल्याने या तरुणांची प्रकृती खराब झाली. यामधील अनिल उर्फ बाळू गिते या तरुणाची प्रकृती जास्तच बिघडली आणि त्याचा बुधवारी रात्री दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर ग्रामस्थ, वनविभाग आणी पोलीस प्रशासनाने मृत व्यक्तीसह पर्यटकांना गडावरून रेस्क्यू करण्यात आले आहे. यातील आणखी तीन पर्यटकांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
अनिल उर्फ बाळू नाथाराव गिते, अनिल मोहन आंबेकर, गोविंद दत्तात्र्यय आंबेकर, हरिओम विठ्ठल बोरुडे, तुकाराम आसाराम तिपाले, महादू जगन भुतेकर अशी ट्रेकिंगसाठी गेलेल्या तरुणांची नावे आहेत. सध्या या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. या तरुणांना ट्रेकिंगला जाणे चांगलेच महागात पडले आहे. त्यामुळे नागरिकांनी ट्रेकिंग जाताना विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे.





