Shirur : नऊ रंगांत नटली येमाई माता
Shirur : कवठे येमाई गावापासून दक्षिणेस तीन किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य परिसरात श्री येमाई देवीचे प्राचीन मंदिर वसले आहे. नवसाला पावणारी आणि जागृत देवस्थान म्हणून या मंदिराची राज्यभर ख्याती आहे.

शिरूर : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील कवठे येमाई गावचे ग्रामदैवत आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री येमाई देवी मंदिरात नवरात्रोत्सव भक्तिभावाने साजरा होत आहे. नऊ दिवस देवीची विविध रूपांतील सालंकृत पूजा, नऊ रंगांची आकर्षक वस्त्रे, पारंपरिक धार्मिक विधी, गोंधळ, भजन आणि आरती अशा कार्यक्रमांनी मंदिर परिसर भक्तिमय झाला आहे. देवीच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविक दाखल होत आहे. नवस फेडण्यासाठी आणि मनोकामना पूर्ण होण्याच्या श्रद्धेने भाविकांची मोठी गर्दी होत आहे.
कवठे येमाई गावापासून दक्षिणेस तीन किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य परिसरात श्री येमाई देवीचे प्राचीन मंदिर वसले आहे. नवसाला पावणारी आणि जागृत देवस्थान म्हणून या मंदिराची राज्यभर ख्याती आहे. पुणे, मुंबई, नगर, नाशिक, जळगाव आदी भागांतून भाविक कुटुंबासह देवीच्या दर्शनासाठी येतात. नवरात्रोत्सव आणि चैत्र पौर्णिमेच्या यात्रेला येथे विशेष महत्त्व आहे.
नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून मंदिरात पारंपरिक पद्धतीने घटस्थापना करण्यात येते. देवीचे पारंपरिक पुजारी शिंदे गुरव परिवाराकडून नियमित पूजा-अर्चा केली जाते. नऊ दिवस देवीला पारंपरिक दागिन्यांसह विविध अलंकारांनी सजविण्यात येते. दररोज वेगवेगळ्या रंगांची वस्त्रे परिधान केली जात असल्याने देवीचे मनोहारी रूप भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.
सकाळी सप्तशती पठण, गोंधळ, आरती आणि महापूजा, सायंकाळी सप्तशती वाचन, पूजा, नैवेद्य, गोंधळ आदी धार्मिक कार्यक्रम होत आहेत. होमहवनासाठी पुणे, नाशिक आदी ठिकाणांहून पुरोहितांना बोलावले जाते. ग्रामपुरोहित जोशी कुटुंबीय, गोरे कुटुंबीय धार्मिक विधींसाठी सहकार्य करतात. गोंधळी, आराधी, भराडी समाजातील कलाकारांकडून पारंपरिक जागरण-गोंधळ, भेदिक आणि कलगीतुरा सादर केला जात आहे.
पहाटेपासून धार्मिक विधींची परंपरा
नवरात्र काळात पहाटे पाच वाजता गोंधळी समाजाकडून देवीची आरती केली जाते. सकाळी नऊ आणि सायंकाळी सात वाजता शिंदे गुरव व ढोरके भक्तांच्या उपस्थितीत ओलांडा हा पारंपरिक धार्मिक विधी होतो. गोरे-पाटील कुटुंबीयांकडे देवीच्या पूजा-अभिषेकाचा मान आहे. अनेक वर्षांपासून हे कुटुंब श्रद्धेने ही सेवा बजावत आहे. श्री येमाई देवी ट्रस्टच्या माध्यमातून विविध विकासकामे करण्यात आली आहेत. भाविकांच्या निवासासाठी मंदिर परिसरात खोल्यांचीही व्यवस्था केली आहे.





