मंचर : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील जांभोरी येथे शेतकरी भागूजी रामजी केंगले यांची शेळी बिबट्यांनी ठार केली. बिबट्याच्या उपद्रवामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. या बिबट्यांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. आदिवासी भागातील जांभोरी येथील शेतकरी भागूजी रामजी केंगले यांच्या शेळ्या जांभोरी येथील गावातील इराचे रान परिसरात चरण्यासाठी गेल्या असता बिबट्याने केलेल्या हल्ल्यामध्ये शेळी ठार झाली. सुमारे २० हजार रुपयांचे शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. यामुळे परिसरातील नागरिक भयभित झाले आहेत. संबंधित शेतकरी व ग्रामस्थांनी घटना वन विभागाला कळवल्यानंतर वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी कुणाल लिंबकर यांच्या मार्गदर्शनाखाली तळेघर वनपाल सुवर्णा जगताप यांनी तात्काळ येऊन पंचनामा केला आहे. घटनास्थळी शेतकरी भागूजी रामजी केंगले, उपसरपंच बबन केंगले, वनपाल सुवर्णा जगताप, युवानेते मारुती केंगले, कळंबई गावचे पोलीस पाटील कैलास घोडे, अरुणशेठ केंगले, वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामचंद्र केंगले व ग्रामस्थ यांनी भेट दिली आणि वन विभागाने येथे पिंजरा लावावा, अशी मागणी केली.