कोपर्डेहवेली – आजकाल व्हॉटस्ऍपचा वापर प्रत्येकजण आपापल्यापरीने संदेश पाठवण्यासाठी करत असतात. त्या माध्यमातून जगभरातील अनेकजण एकमेकांशी जोडले गेलेले आहेत. याच माध्यमातून व्हिडिओ कॉल करून शेळीची यशस्वीरित्या प्रसुती करून तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर केल्याची घटना तुकाईवाडी ता. सातारा येथे नुकतीच घडली. व्हॉटस्ऍपच्या दुनियेत हे कौतुकास्पद उदाहरण आहे.
तुकाईवाडी ता. सातारा येथील शाहिद जुबेर मुलाणी हा सुशिक्षित तरूण शेळीपालन व्यवसाय करतो. त्यातूनच त्याच्या कुटूंबाचा उदरनिर्वाह चालतो. कोपर्डे येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे डॉ. अनिल घाडगे यांचे सहकार्य त्याला नेहमीच मिळते. बऱ्याचदा आजारपणात उपचारासाठी त्यांच्याशी संपर्कात रहावे लागते. शासकिय सुट्टीच्या दिवशी शाहिदला शेळीच्या प्रसुतीची लक्षणे दिसल्याने त्याने डॉ. घाडगे यांच्याशी संपर्क साधला. शेळीपर्यंत पोहोचण्यासाठी डॉक्टरांना वेळ लागणार होता. त्यावेळी शेळीची सद्यस्थिती जाणण्यासाठी त्यांनी व्हिडीओ क्लीप पाठविण्यास सुचविले.
त्यावरून त्यांना शेळीची प्रसुती तात्काळ होणे आवश्यक असल्याचे लक्षात आले. म्हणून डॉक्टरांनी व्हिडिओ कॉल सुरूच ठेऊन प्राथमिक सूचना देऊन शाहिद यास प्रसुती करण्यास सांगितले. त्यातही शेळीच्या पिलाचे तोंड विरुद्ध दिशेस असल्याचे जाणवले. दरम्यान शाहिद व त्याच्या पत्नीस धीर देऊन गरजेप्रमाणे सूचना देऊन प्रसुती यशस्वीरित्या करण्यात आली. पिलाच्या जन्मानंतर मात्र शाहिद व त्यांच्या पत्नीस शेळी व तिचे पिलू जगल्याचा अत्यानंद झाला व त्यांनी डॉ.अनिल घाडगे यांचे आभार मानले.
अनेकदा मोबाईल, व्हॉटस्ऍपचे आपण गैरवापर झाल्याचे पाहतो. परंतु प्रगत तंत्रज्ञानाचा वापर सकारात्मक केल्याने ऐन महागाईत शेळी व पिलाचा जीव वाचल्याचा असाही फायदा झाला. सध्या ही बाब कोपर्डेहवेली व तुकाईवाडी परिसरात चर्चेची ठरली आहे.
अभिनेते अमिर खान यांच्या थ्री इडिएटस् चित्रपटात एका दृश्यात असेच घडल्याचे सर्वांनी पाहिले असेल. पण फक्त फोनवर ऐकून प्रत्यक्षात शेळीची प्रसुती करण्याचा प्रसंग अंगावर शहारे आणणारा होता.
– शाहिद मुलाणी