पुणे जिल्हा | लाडकी बहीणचे अर्ज घरी जाऊन भरून घ्या

इंदापूर, (प्रतिनिधी)- इंदापूर तालुक्यातील जवळपास 25 ते 30 हजार महिला लाभार्थी यांनी अद्याप मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरलेले नाहीत. त्या महिलांच्या घरी जाऊन अधिकार्यांनी त्यांचे अर्ज भरून महिलांना सहकार्य कराव, अशा सूचना माजी राज्यमंत्री व आमदार दत्तात्रय भरणे यांनी अधिकार्यांना दिल्या.
इंदापूर येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा सभागृहात रविवारी (दि. 11) लाडकी बहीण योजनेच्या कामकाजाचा आढावा बैठक व पत्रकार परिषदेचे आयोजन योजनेचे तालुका अध्यक्ष आमदार दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते.
यावेळी बैठकीस तहसीलदार जीवन बनसोडे, मुख्याधिकारी रमेश ढगे, बालविकास प्रकल्प अधिकारी अमोल मेरगळ, प्रकल्प अधिकारी संदीप काळे, योजनेचे पर्यवेक्षिका मनिषा बाबर, राणी जाधव, उषा जाधव व युवक नेते शुभम निंबाळकर उपस्थित होते.
आमदार भरणे म्हणाले की, लाडकी बहीण योजनेचे तालुक्यात एकूण 1 लाख 5 हजारपर्यंत लाभार्थी आहेत. त्यातील जवळपास 77 हजार महिलांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत.
त्यातील 13 हजार 432 महिलांनी ऑफलाइन अर्ज भरले आहेत. त्यांचे ऑनलाइन अर्ज भरणी कामकाज चालू आहे. उर्वरीत जवळपास 30 हजार महिलांचे अर्ज भरणे बाकी असून, येणार्या 31 ऑगस्टपर्यंत त्यांचे अर्ज अधिकार्यांनी भरून घ्यावेत. तालुक्यातील एकही लाभार्थी महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी, अशाही सूचना भरणे यांनी दिल्या.
ज्येष्ठांना तीर्थक्षेत्र दर्शन
आर्थिक दुर्बल घटकातील गरीब महिलांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहेत. तसेच ज्येेष्ठांना मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजनेतून वर्षाला तीस हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे या योजनेच्या लाभार्थांची देखील नोंदणी करून घ्यावी, अशाही सूचना अधिकार्यांना आमदार भरणे यांनी दिल्या.
वर्षाला 180 कोटी रुपयांचा लाभ मिळणार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतुन इंदापूर तालुक्यातील 1 लाख 5 हजार महिलांना वर्षाला 180 कोटी रुपयांचा फायदा या योजनेतून होणार आहे. हिशेब केला तर महिन्याला 15 कोटी, दिवसाला 50 ते 55 लाख असा लाभ मिळणार आहे. त्यामुळे एकही लाभार्थी महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही याची अधिकार्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन आमदार भरणे यांनी केले.





