जागतिक पातळीवर गव्हाच्या किमती वाढल्या

नवी दिल्ली- रशिया- युक्रेन युद्धानंतर जागतिक व्यापारावर झालेला नकारात्मक परिणाम बऱ्याच प्रमाणात कमी झाला होता. मात्र आता रशिया- युक्रेन युद्ध आणखीच चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्या अगोदर काळ्या समुद्रातून होणाऱ्या अन्न वाहतुकीला अडथळे न आणण्याचे युक्रेन आणि रशियाने ठरविले होते. मात्र रशियाने या करारातून अंग काढून घेतले आहे. परिणामी गेल्या तीन दिवसापासून जागतिक बाजारात गव्हाच्या किमती वाढू लागल्या आहेत.
रशियाने आज सांगितले की, कोणतेही जहाज युक्रेनच्या बंदरावर आले तर ते लष्करी जहाज आहे असे समजले जाईल. गेल्या आठवड्यात रशियाने युक्रेन मधील गव्हाच्या साठ्यावर क्षेपणास्त्राचे हल्ले केले आहेत. त्याचबरोबर बंदरावरही हल्ले करण्याचे धमकी दिली आहे. अशा परिस्थितीत जागतिक अन्नपुरवठ्यावर नकारात्मक परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या पेचप्रसंगातून मार्ग काढण्यासाठी युरोप आणि अमेरिकेला प्रयत्न वाढवावे लागणार असल्याचे समजले जाते. यामुळे सध्या जागतिक पातळीवर गव्हाचे दर गेल्या तीन दिवसापासून एकतर्फी वाढत आहेत. रशियाने घेतलेल्या या निर्णयाबद्दल संयुक्त राष्ट्राने चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर लाखो लोकांसमोर उपासमारीचे संकट निर्माण होऊ शकते.
गेल्या आठवड्यात रशियाने युक्रेनच्या धान्य गोदामावर केलेल्या हल्ल्यामुळे 60 हजार टन गव्हाचे नुकसान झाले असल्याचे युक्रेनच्या कृषी मंत्रालयाने सांगितले आहे. युक्रेनमधून पाठवलेला गहू आफ्रिका आणि मध्ये आशियातील देशांना दिला जातो. रशिया अप्रत्यक्षपणे आफ्रिका आणि मध्ये आशियातील देशावर हल्ला करीत असल्याचा आरोप युक्रेनच्या अन्न मंत्रालयाने केला आहे.
रशियाने म्हटले आहे की, रशियन ऍग्रीकल्चर बॅंकेवरील निर्बंध संपुष्टात आणावे. त्याचबरोबर रशियाचे धान्य जागतिक बाजारात जाऊ द्यावे. या मागण्या मान्य केल्या तर आम्ही युक्रेनच्या गोदामावर हल्ले करणार नाही. गेल्या वर्षी काळा समुद्रातून वाहतुकीसंदर्भातील करार झाल्यानंतर आतापर्यंत 32 दशलक्ष टन एवढे युक्रेनचे धान्य जागतिक बाजारात गेले आहे. निर्यातीसाठी बंदराचा वापर करता आला नाही तर युक्रेनला सर्व निर्यात जमिनीवरून करावी लागेल. त्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढेल. जागतिक बाजारात अन्नधान्याच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. याचा सर्वात जास्त परिणाम युक्रेनच्या धान्यावर अवलंबून असलेल्या गरीब देशावर होणार आहे.





