शहरी भागांना अधिक धोका असल्याचे अभ्यासातून अधोरेखित
रोगांचा प्रसार करणाऱ्या डासांच्या अभ्यासाच्या आधारे निष्कर्ष
पुणे – जागतिक तापमानवाढीमुळे निर्माण होणाऱ्या वातावरणीय, आर्थिक समस्यांबरोबरच आता आरोग्याच्या समस्याही उद्भवण्याचा धोका वाढला आहे. नुकत्याच प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, जागतिक तापमान वाढीमुळे दक्षिण आशियाई राष्ट्रांना विशेषत: याठिकाणच्या शहरी भागांमध्ये डेंग्यू, मलेरिया यासारख्या रोगाचा धोका वाढणार असल्याचा निष्कर्ष अभ्यासकांनी मांडला आहे.
अभ्यासकांनी या रोगांचा प्रसार करणाऱ्या डासांच्या अभ्यासाच्या आधारे हा निष्कर्ष मांडला आहे. यासाठी एकात्मिक “मल्टी-मॉडेल, मल्टी-सिनेरियो’ फ्रेमवर्कचा वापर करत, प्रसारण हंगामाच्या कालावधीमध्ये हवामान बदलाचा कितपत प्रभाव होतो, याबाबत अभ्यास करण्यात आला. त्यामुळे जागतिक तापमानवाढीमुळे महापूर, दुष्काळ आणि त्याअनुषंगाने येणाऱ्या आर्थिक आव्हानांबरोबरच आता आरोग्याचीही चिंता अभ्यासकांना सतावत आहे.
लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसिन, स्वीडनमधील उमेआ विद्यापीठ, इटली येथील अब्दुस सलाम इंटरनॅशनल सेंटर फॉर थिओरेटिकल फिजिक्स, जर्मनीतील युनिव्हर्सिटी ऑफ हेडलबर्ग, जर्मनी आणि लिव्हरपूल युनिव्हर्सिटीमधील संशोधकांनी हा अभ्यास केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आफ्रिकन प्रदेश, दक्षिण-पूर्व आशियाई राष्ट्रे आणि अमेरिकेतील दाट लोकवस्ती असलेल्या शहरी भागात मलेरिया आणि डेंग्यूचा धोका जास्त असेल असा अंदाज या अभ्यासात व्यक्त करण्यात आला आहे.
काय आहे कारण?
अभ्यासकांच्या मते, डेंग्यू आणि मलेरियाचा प्रसार करणाऱ्या डासांच्या उत्त्पतीसाठी उष्ण अणि ओलसर वातावरण उपयुक्त ठरते. अलीकडील काळात हिवाळ्याचा कालावधी कमी झाला असून, याकाळातील तापमान वाढत आहे, तर उन्हाळा लवकर येत आहे. त्यामुळे डासांसारख्या वाहकांना प्रजननासाठी अधिक वेळ मिळतो. त्याचबरोबर डासांची पैदास करण्याच्या पद्धतीत ही बदल झाला आहे. सामान्यत: या डासांची उत्पत्ती स्वच्छ पाण्यात होत असल्याचे मानले जाते. मात्र, घाण पाण्यातही या डासांची उत्पत्ती होत असल्याचे नुकतेच संशोधकांना आढळून आले आहे.