ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज व अष्टपैलु ग्लेन मॅक्सवेल याने एकदिवसीय सामन्यांतून निवृत्ती जाहीर केली व चाहत्यांना धक्काच बसला. विराट कोहली व रोहित शर्मा यांनी कसोटीतून निवृत्ती गेतल्यावर जसा धक्का बसला होता तसाच हा धक्का होता. २०२३ सालच्या विश्वकरंडकात त्याने अफगाणिस्तानविरुद्ध ७ बाद ९१ अशा दयनिय स्थितीतून ऑस्ट्रेलयाला बाहेर काढले. केवळ बाहेर काढले नाही तर एक अविश्वसनिय विजय मिळवून दिला. त्यात मॅक्सवेलच्या नाबाद द्विशतकी खेळीचाच मोलाचा वाटा होता. त्यात त्याने १२८ चेंडूत १० षटकार व तब्बल २१ चौकारांची बरसात केली होती. कसे विसरता येइल. हाच माणूस होत्याचे न्हवते करणारा होता, कारण त्याला त्याची अफाट क्षमता माहीती होती व त्यानूसारच तो खेळायचा. आता त्याची फलंदाजी केवळ टी-२० क्रिकेटमध्येच पाहायला मिळणार आहे. वयाच्या ३६ व्या वर्षी त्याने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली तरीही तो धक्का मानला जात आहे कारण त्याला केवळ यंदाच्या आयपीएल स्पर्धेत अपयश आले होते त्यापूर्वी त्याने जे सातत्य राखले होते ते कमालीचे होते. मॅक्सवेलने १४९ एकदिवसीय सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले व ३,९९० धावा केल्या आणि ७७ बळीही घेतले. त्याचा स्ट्राईक रेट १२६.७० होता व हीच त्याची खासियात होती. कारण इतक्या मोठ्या स्ट्राईकरेटने आजही कोणी सातत्याने धावा करताना दिसत नाही. देशातील नवोदित खेळाडूंना संधी मिळावी यासाठी त्याने हा निर्णय घेतला. मात्र, त्याच्या एकदिवसीय सामन्यातील निवृत्तीने ऑस्ट्रेलिया संघात जी पोकळी निर्माण झाली आहे ती भरुन काढणे केवळ अशक्य आहे. यंदाच्या आयपीएल स्पर्धेत त्याला पंजाबकडून खेळण्याची संधी मिळाली होती मात्र, त्याला फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. त्यामुळे त्याच्यावर टीकाही खूप झाली.मॅक्सवेलने २०१२ मध्ये ऑस्ट्रेलियाकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तो २०१५ आणि २०२३ सालच्या विश्वकरंडक जिंकणाऱ्या संघाचा महत्वाचा भाग होता. २०२३ सालच्या विश्वकरंडकात अफगाणिस्तानविरुद्ध नाबाद २०१ धावा केल्या व त्याची जागतिक कीर्ती व कारकीर्द आणखीनच उजळली. ही खेळी केवळ अविश्वसनिय होती कारण त्याच्या पायाला दुखापत झाली होती व त्याने पाय घट्ट रोवून फलंदाजी केली. त्याला पायांची हालचालही करता येत नव्हती मात्र, तरीही त्याने ही स्वप्नवत खेळी केली व संघाला विजय मिळवून दिला. ही व अशा कीतीतरी खेळी त्याने केला व आपलाही एक चाहता वर्ग निर्माण केला. आता एकदिवसीय सामन्यांतून त्याने तडकाफडकी निवृत्ती का घेतली यावर चर्चा सुरु राहणार आहे. मात्र, टी-२० क्रिकेटमध्ये तो पुढील काळात खेळत राहणार आहे हीच त्याच्या चाहत्यांसाठी आनंदाची बाब ठरत आहे.