बंगळुरू : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते के.एन.राजन्ना यांना सोमवारी कर्नाटक मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला. कथित मतचोरीच्या मुद्द्यावरून स्वपक्षाच्या राज्य सरकारला घरचा आहेर देणे त्यांच्या अंगलट आले. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी मागील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीवेळी कर्नाटकात मतचोरी घडल्याचा दावा केला. त्यानंतर कथित मतचोरीवरून संपूर्ण देशातील वातावरण ढवळून निघाले आहे. अशात ७४ वर्षीय राजन्ना यांनी वेगळीच भूमिका मांडून कॉंग्रेस आणि राज्य सरकारचीच कोंडी केली. कॉंग्रेसची सत्ता असताना कर्नाटकमध्ये कथित मतचोरी घडली. आमच्या डोळ्यांसमोर ते घडले, असे त्यांनी म्हटले. त्यामुळे मतचोरीचा ठपका अप्रत्यक्षपणे कर्नाटकमधील कॉंग्रेस सरकारवर ठेवला जात असल्याचे चित्र समोर आले. त्यातून कॉंग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाची नाराजी त्यांनी ओढवून घेतली. त्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सहकार मंत्री असणाऱ्या राजन्ना यांना राजीनाम्याचा आदेश दिला. मात्र, त्यांनी आदेशाचे तातडीने पालन केले नाही. त्यामुळे सिद्धरामय्या यांनी राजन्ना यांना मंत्रिमंडळातून हटवण्याची शिफारस केली. ती राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी स्वीकारली.