नवी दिल्ली – बिस्किटाच्या एका पॅकेटची किंमत फार नसते. जे ग्राहक ते विकत घेतात त्यांना बहुतेक वेळा त्या पॅकेटमध्ये किती बिस्किटे आहेत याची कल्पना नसते म्हणजे त्यांनी ते मोजलेले नसते.अर्थात पॅकेटमध्ये किती बिस्किट आहेत याचा उल्लेख बिस्किटाचे उत्पादन करणाऱ्या कंपनीने केला असतो. मात्र विकत घेणारा ते वाचत नाही. जो कॅलरी कॉन्शस असतो तो असले प्रकार वाचतो. त्यातही त्याचे वाचन ते पॅकेट पूर्ण खाल्ले तर आपण किती कॅलरी सेवन करू यापुरते मर्यादीत असते. फार तपशीलात कोणी जात नाही. मात्र या तपशीलात जाणारा आणि त्याप्रमाणे वस्तू न मिळाल्यामुळे भांडलेल्या एका ग्राहकाला चक्क 1 लाख रूपयाचा लाभ झाला आहे.
2021 मध्ये चेन्नईत राहणाऱ्या पी. दिलीबाबू नामक इसमाने बिस्किटांचे एक पॅकेट विकत घेतले होते. सनफीट मारी लाइट हे त्या आयटीसी कंपनीच्या बिस्किटाचे नाव. त्याने जेंव्हा पॅकेटमधील बिस्किट मोजले तेंव्हा त्याला त्यात एक बिस्किट कमी असल्याचे म्हणजे 16 ऐवजी 15 बिस्किटे त्यात असल्याचे आढळून आले. त्याने याबाबत स्थानिक दुकानदाराशी संपर्क साधला. त्याला समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यानंतर त्याने याबाबत आयटीसीकडून खुलासा मागितला. तेथूनही त्याला समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यानंतर दिलीबाबूने कंपनी आणि ते बिस्किट विकणाऱ्या दुकानदाराच्या विरोधात ग्राहक न्यायालयात 10 कोटी रूपये नुकसान भरपाईचा दावा ठोकला. अयोग्य व्यापार आणि सेवेतील त्रुटी असे मुद्दे उपस्थित करत त्याने नुकसान भरपाईचीही मागणी केली. पॅकेटमधील एका बिस्किटाची किंमत 75 पैसे आहे. कंपनी रोज 50 लाख पॅकेटस्चे उत्पादन करते. त्या हिशेबाने विचार केला तर कंपनी ग्राहकांना रोज 29 लाख रूपयांना फसवते आहे असे दिलीबाबूने तक्रारीत म्हटले होते.
कंपनीचे म्हणणे काय?
बिस्किट निर्मात्या कंपनीच्या वकीलाने असा युक्तीवाद केला की, उत्पादन केवळ वजनाच्या आधारावर विकण्यात आले होते, बिस्किटांच्या संख्येच्या आधारावर नाही. मात्र कंपनीचे असल्या पध्दतीचे दावे अमान्य करण्यात आले. खरेदीदार वजन करून नाही तर पॅकेट बघून वस्तू विकत घेतो. 16 बिस्किटांच्या पॅकेटचे वजन 76 ग्रॅम होते तर 15 बिस्किटांच्या पॅकेटचे वजन 74 ग्रॅम असल्याचे निदर्शनास आले.
त्यानंतर कंपनीच्या वकीलाने मेट्रोलॉजी रूल्स 2011 चा हवाला देत दावा केला की, जर अगोदरच पॅक केलेल्या वस्तूचे घोषित शुध्द प्रमाण 50 ग्रॅम ते 100 ग्रॅमच्या दरम्यान असेल तर अशा वस्तूंच्या वजनात घोषित प्रमाणापेक्षा साडेचार ग्रॅम कमी किंवा अधिक त्रुटी स्विकारार्ह आहे. मात्र तरीही ग्राहक मंचाने एक बिस्किट कमी असल्याचे आढळून आल्याबद्दल संबंधित कंपनीला संबंधित ग्राहकाला 1 लाख रूपये भरपाई देण्याचे निर्देश दिले.