Chana Dal Poori: नेहमीच्या पुऱ्यांना द्या हटके ट्विस्ट; घरच्या घरी बनवा कुरकुरीत चणा डाळ पुरी!
Chana Dal Poori चणा डाळीचे सारण, मसाल्यांचा खमंग स्वाद आणि बाहेरून कुरकुरीत असलेल्या या पुऱ्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतील. विशेष म्हणजे या पुऱ्या बनवण्याची पद्धतही अगदी सोपी आहे.

Chana Dal Poori: सणासुदीचे दिवस म्हटले की घराघरांत विविध चविष्ट पदार्थांची रेलचेल पाहायला मिळते. दिवाळी असो किंवा इतर कोणताही सण, या दिवसांत जेवणाच्या ताटात गरमागरम पुरी आणि बटाट्याची रस्सेदार भाजी असेल तर जेवणाची मजाच काही और असते. साधारणपणे सणासुदीला प्रत्येक घरात गव्हाच्या पिठाच्या साध्या पुऱ्या केल्या जातात. मात्र, यावेळी नेहमीच्या पुऱ्यांऐवजी काहीतरी वेगळे करून पाहायचे असेल, तर चणा डाळीच्या भरवलेल्या पुऱ्या हा उत्तम पर्याय ठरू शकतो. चणा डाळीचे सारण, मसाल्यांचा खमंग स्वाद आणि बाहेरून कुरकुरीत असलेल्या या पुऱ्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतील. विशेष म्हणजे या पुऱ्या बनवण्याची पद्धतही अगदी सोपी आहे.
चणा डाळीच्या पुऱ्या बनवण्यासाठी लागणारे साहित्य
पुऱ्यांसाठी साहित्य :
– २ कप गव्हाचे पीठ
– २ मोठे चमचे रवा
– चवीनुसार मीठ
– २ चमचे तेल किंवा तूप
– ओवा
– कसुरी मेथी
– थोडी लाल तिखट पूड
– आवश्यकतेनुसार कोमट पाणी
सारणासाठी साहित्य :
– १ कप चणा डाळ
– १ चमचा आले-हिरव्या मिरचीची पेस्ट
– चिमूटभर हिंग
– १ चमचा आमचूर पावडर
– १ चमचा धणेपूड
– अर्धा चमचा हळद
– अर्धा चमचा गरम मसाला
– चवीनुसार मीठ
– पुऱ्या तळण्यासाठी तेल

Chana Dal Puri
सर्वप्रथम तयार करा पुऱ्यांचे पीठ
चणा डाळीच्या पुऱ्या बनवण्यासाठी सर्वप्रथम एका मोठ्या परातीत गव्हाचे पीठ आणि रवा घ्या. त्यामध्ये ओवा, कसुरी मेथी, चवीनुसार मीठ, लाल तिखट आणि थोडे तेल किंवा तूप घाला. हे सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करून घ्या. त्यानंतर थोडे थोडे कोमट पाणी घालत घट्टसर पीठ मळून घ्या. पुऱ्यांसाठी पीठ मळताना ते नेहमीच्या पोळ्यांच्या पिठापेक्षा थोडे घट्ट असावे. पीठ मळून झाल्यानंतर ते १५ मिनिटे झाकून बाजूला ठेवा. यामुळे पीठ व्यवस्थित मुरेल आणि पुऱ्या बनवणे सोपे होईल.
चणा डाळीचे चविष्ट सारण कसे बनवायचे?
पुऱ्यांची खरी चव त्यांच्या सारणात असते. यासाठी सर्वप्रथम चणा डाळ ४ ते ५ तास पाण्यात भिजत ठेवा. डाळ चांगली भिजल्यानंतर त्यातील अतिरिक्त पाणी काढून टाका. आता मिक्सरमध्ये पाणी न घालता डाळ थोडी जाडसर वाटून घ्या.
यानंतर एका कढईत थोडे तेल गरम करा. त्यामध्ये हिंग आणि आले-हिरव्या मिरचीची पेस्ट घालून हलके परतून घ्या. आता त्यात धणेपूड, हळद, गरम मसाला, आमचूर पावडर आणि मीठ घाला. सर्व मसाले व्यवस्थित परतल्यानंतर त्यामध्ये वाटलेली चणा डाळ टाका. हे मिश्रण मंद आचेवर साधारण ५ ते ७ मिनिटे शिजू द्या. डाळीतील ओलावा पूर्णपणे कमी होऊन मिश्रण मोकळे आणि भुसभुशीत झाले की गॅस बंद करा. सारण थंड होण्यासाठी बाजूला ठेवा.
एक गोष्ट लक्षात ठेवा, पुऱ्यांचे सारण शक्यतो कोरडे असावे. सारणात जास्त ओलावा असल्यास पुऱ्या लाटताना फाटू शकतात. त्यामुळे डाळ व्यवस्थित शिजवून तिचे पाणी पूर्णपणे आटवणे महत्त्वाचे आहे.
अशा पद्धतीने तयार करा कुरकुरीत चणा डाळीच्या पुऱ्या
आता तयार केलेल्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून घ्या. प्रत्येक गोळ्याला थोडे तेल लावून मध्यम जाडीची पुरी लाटा. पुरीच्या मध्यभागी तयार केलेले चणा डाळीचे सारण ठेवा. त्यानंतर पुरीच्या कडा एकत्र आणून सारण व्यवस्थित बंद करा. आता हलक्या हाताने पुरीला आकार द्या. सारण बाहेर येणार नाही याची काळजी घ्या.
यानंतर कढईत तेल गरम करा. तेल चांगले तापल्यानंतर त्यामध्ये एकावेळी एक पुरी सोडा. झाऱ्याने पुरीवर हलके दाब दिल्यास ती छान फुलण्यास मदत होते. पुऱ्या दोन्ही बाजूंनी सोनेरी रंगाच्या आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.
बटाट्याच्या भाजीसोबत सर्व्ह करा
अशा प्रकारे तुमच्या गरमागरम, खमंग आणि कुरकुरीत चणा डाळीच्या पुऱ्या तयार होतील. या पुऱ्या बटाट्याच्या रस्सेदार भाजीसोबत खायला अतिशय चविष्ट लागतात. याशिवाय छोले किंवा आपल्या आवडीच्या कोणत्याही भाजीसोबतही त्या सर्व्ह करू शकता. यंदाच्या सणासुदीला नेहमीच्या साध्या पुऱ्यांऐवजी चणा डाळीच्या पुऱ्या करून पाहा. तुमच्या सणाच्या ताटाला वेगळी चव आणि खास रंगत नक्कीच येईल!





