Maharashtra Politics : विश्वासराव देवकाते यांना विधानपरिषदेवर संधी द्या’; धनगर समाजाने उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे केली मागणी

बारामती : २७ मार्च रोजी होणाऱ्या विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते यांना उमेदवारी द्यावी, यासाठी बारामतीत धनगर समाजाच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन मागणी करण्यात आली. विश्वास देवकाते यांनी बहुजन समाजात चांगले काम केले असून, पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष असताना त्यांनी बहुजन समाजाची कामे केली.
उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून सातत्याने विश्वास देवकाते यांना संधी देण्याचे आश्वासन देण्यात आले. या वेळी तरी धनगर समाजाची मागणी लक्षात घेत अजित पवार यांनी देवकाते यांना विधानपरिषदेवर संधी द्यावी, अशी मागणी सकल धनगर समाजाच्या वतीने करण्यात आली. आता तरी अजित पवार हे विश्वास देवकाते यांना संधी देणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
या पत्रकार परिषदेला माजी पंचायत समिती सदस्य राहुल झारगड, बापूराव सोलनकर, दत्तात्रय पुणेकर, नंदूआबा देवकाते, सतीश कोकरे, भाऊसाहेब गुलदगड, रावसाहेब चोरमले, मुरलीधर ठोंबरे, आप्पा काळे, राजेंद्र झारगड, अली असगर नगरवाला आदी उपस्थित होते.





