Dhananjay Powar : “आमची महादेवी आम्हाला परत द्या”; धनंजय पोवाराची सरकारकडे मागणी, भावनिक Video केला शेअर म्हणाला…

Dhananjay Powar : कोल्हापूरच्या नांदणी मठातील महादेवी हत्तीणीला अखेर गुजरातच्या वनतारा अभयारण्याकडे रवाना करण्यात आले आहे. नांदणीच्या ग्रामस्थांनी महादेवी हत्तीणीला निरोप देतानाचा भावूक क्षण अनेकांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या करणारा ठरला. ग्रामस्थांचा महादेवीला निरोप देतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत ग्रामस्थ आणि महादेवी यांच्यातील असलेले घट्ट नाते दिसून आले.
मात्र, यानंतर अनेकांनी न्यायालयाने दिलेला निर्णय चुकीचा असून महादेवी हत्तीणीला पुन्हा नांदणीत आणण्याची मागणी जोर धरू लागली आहे. अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबत व्यक्त होत आहेत. अशातच आता या संपूर्ण प्रकरणावर बिग बॉस मराठी फेम सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर धनंजय पोवार उर्फ डीपीदादानं एक भावनिक व्हिडीओ शेअर केला आहे.
आपण ज्या सरकारला निवडून दिलं आहे, ते सरकार, वनविभाग आणि त्या कुटुंबाला हे लक्षात यायला हवं की, जो विरोध केला जात आहे. तो आर्थिक गोष्टींसाठी नाही, हा भावनिक विषय आहे. लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, असं धनंजयने शेअर केलेल्या व्हिडीओत म्हटलं आहे.
माणसांमध्ये वाढलेली आहे ती, माणसांच्या प्रेमाची भुकेली आहे. तिच्या छत्रछायेखाली तिच्या आशीर्वादाने, तिच्या आनंदात तिच्या दु:खात कितीतरी लोक लहानाचे मोठे झाले. गेली कित्येक वर्ष… आज सांगली, कोल्हापूर आणि कर्नाटका सीमा भागातील अनेक लोकांची तिच्याभोवती वर्दळ होती. हे फक्त तिच्या प्रेमापोटी.
लाखों लोकांचा जनसमुदाय तुमच्यासमोर, तुमच्या विरोधात उभा राहिला. कारण म्हणजे प्रेम भावना आणि तिची असलेली काळजी. या लाखो लोकांचा विचार करा. त्यांच्या भावनेचा विचार करा. ती हत्तीण त्यांना परत द्या, अशी मागणी धनंजय उर्फ डीपीदादाने सरकारकडे केली आहे.
View this post on Instagram
पुढे डीपीददा म्हणाला, मला हजारो लोकांनी मेसेज केले आहेत की, यावर काहीतरी पर्याय असायला हवा. यासाठी तुम्ही बोला. पण मी लोकांना व्यक्त होण्यासाठी किंवा प्रवृत्त करण्यापेक्षा हे म्हणेन की, तुम्ही जिला घेऊन गेला आहात, त्याचं कारण काहीही असो. पण हजारो लोकांच्या भावनांचा विचार करून तुम्ही तिला परत द्या. मला एवढंच सांगायचं की त्या लाखो लोकांचा आशिर्वाद घ्या, त्यांना तळतळाट देण्यावर भाग पाडू नका, अशी संतप्त भावना डीपीदादाने व्यक्त केली.
नेमकं प्रकरण काय?
कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठातील महादेवी हत्तीण जैन धर्मियांचं श्रद्धेच ठिकाण मानलं जातं. मागील ३३ वर्षांपासून महादेवी हत्तीण येथे होती. 2021 मध्ये गुजरातमधल्या वनतारा या खाजगी अभयारण्याच्या अधिकाऱ्यांकडून मठाशी संपर्क साधण्यात आला आणि हत्तीणीची मागणी करण्यात आली. पण ही मागणी मान्य करण्यात आली नाही. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, न्यायलयाने यावर निर्णय देत महादेवी हत्तीणीला वनतारा या खासगी अभयारण्यात हलवण्याचे आदेश दिले.





