Satara | भक्कम साथ द्या; शासकीय योजना सुरुच राहतील

वाई, (प्रतिनिधी)- सर्व जातीधर्मांना सोबत घेऊन विकासाचे काम करणारे, तसेच शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारधारेने काम करणारे हे सरकार आहे.
आपल्याला विकासाच्या दिशेनं पुढे जायचं आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला आशीर्वाद द्या, भक्कम साथ द्या, तमाम शासकीय योजना अशाच सुरूच राहतील, असी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
वाईतील द्रविड हायस्कूलच्या मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जनसन्मान यात्रा व विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजनप्रसंगी झालेल्या जाहीर सभेत अजित पवार बोलत होते.
खासदार नितीन पाटील, आमदार मकरंद पाटील, बकाजीराव पाटील, प्रतापराव पवार, बाळासाहेब सोळसकर, दत्तानाना ढमाळ, बाबुराव संकपाळ, राजेश वाठारकर, बंडा गाेडसे, प्रमोद शिंदे, उदय कबुले, जयसिंग चव्हाण,
शशिकांत पिसाळ, मनोज पवार, अनिल सावंत, संजय लोळे, राजेंद्र तांबे, मनीषा गाढवे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी १५ कोटीचा कृष्णा नदीवरील पूल, धोम धरण भिंतीखालील १०.५ काेटीचा व्याहळी कॉलनी- धोम पूल आणि रस्ता, ४.५० कोटीची वाई नगरपालिका शाळा (क्र.१) ची इमारत याचे उदघाटन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच कृष्णा नदी तीरावरील ७ घाटांवरील हेरिटेज वॉक प्रकल्प (२.९७ कोटी) व नाना नानी पार्क (१ कोटी ५ लाख), प्रतापगड फाटा ते सुरूर (२९३ कोटी), वाई शहरासाठी धोम धरणातून नळ पाणीपुरवठा योजना (५८ कोटी ७२ लाख), शहर सांडपाणी प्रक्रिया योजना-एसटीपी प्लॅंट (२२ कोटी ९१ लाख), एकसर- वाई रस्ता (४.५० कोटी),
भुईंज कारखाना ते राऊतवाडी रस्ता (३ कोटी), रायरेश्वर फाटा ते खावली घाट रस्ता (५ कोटी), भूसंपादनासह महाबळेश्वर बाह्यवळण रस्ता (२५ कोटी), महाबळेश्वर पोलीस ठाणे इमारत (२.०७ कोटी), महाबळेश्वर प्रशासकीय इमारत (१७.६७ कोटी) आदी कामांचे भूमिपूजनही यावेळी अजित पवार यांच्याहस्ते दूरदृष्य प्रणालीव्दारे करण्यात आले.
अजित पवार म्हणाले की, केंद्रात आपल्या विचारांचं सरकार असल्यानं कांदा निर्यातवरील बंदी उठवली. ऊसाची एमएसपी (न्यूनतम समर्थन मूल्य) वाढवली.
मी शेतकऱ्यांना साथ देणारा शेतकरी पुत्र आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याची धमक आमच्यात आहे. विधानसभा निवडणुकीसाठी काही ठिकाणी घड्याळ, काही ठिकाणी धनुष्यबाण तर काही ठिकाणी भाजपचे कमळ चिन्ह असेल.
ही सर्व महायुतीची चिन्हे आहेत. तुमच्या मतदारसंघात घड्याळ चिन्ह असेल,” असं म्हणत अजित पवार यांनी वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार मकरंद पाटील हेच पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे उमेदवार असतील, अशी घोषणा केली.
आ. मकरंद पाटील म्हणाले, आर्थिक अडचणीतील किसन वीर कारखान्याची जबाबदारी घेण्यास तयार नव्हतो. त्यावेळी तुम्ही कार्यकर्त्यांनीच निवडणूक लढवून कारखाना ताब्यात घेण्याची मागणी वारंवार केली होती.
कारखाना वाचला पाहिजे, शेतकऱ्यांचे अश्रू पुसले पाहिजेत. असे तुम्ही म्हणत होतात. कारखाना ताब्यात आल्यानंतर सभासदांनी दिलेल्या भांडवलावर कारखाना सुरू केला.
त्यानंतर वर्षभरात आपल्याला कोणत्याही बँकेने मदत केली नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. आता कारखाना सुरळीत चालवण्यासाठी अजितदादांच्या प्रयत्नातून केंद्रातुन मदतीची गरज भागविली आहे.
अजितदादांच्या प्रयत्नातून वाई खंडाळा महाबळेश्वर तालुक्यांत चार हजार कोटी रुपयांची कामे झाली आहेत. मतदारसंघामध्ये अनेक लोकोपयोगी विकास कामे मार्गी लागली, हे सर्व फक्त अजितदादा यांच्यामुळेच होऊ शकले.
त्यामुळेच त्यांच्याबरोबर जाण्याचे निर्णय घेतला. कॅबिनेट मंत्रिपद देत असतानाही मी नकार देऊन त्याबदल्यात निधी मिळावा ही विनंती केली.
त्यासाठी अजितदादांना भरभरून सहकार्य केले, त्यामुळेच पुढील काळात त्यांच्याबराेबर जाणे गरजेचे आहे. तीन निवडणुकीमध्ये चढत्या मताधिक्याप्रमाणे तुम्ही मला निवडून दिले, त्याप्रमाणे यावेळीही चढत्या मताधिक्याने मला निवडून द्यावे, अशी विनंती त्यांनी केली.
खासदारपदी निवड झाल्याबद्दल यावेळी नितीन पाटील यांची सत्कार करण्यात आला. किसन वीर कारखान्याच्यावतीने उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, शशिकांत पिसाळ, संदीप चव्हाण,
सचिन साळुंखे, किरण काळोखे यांनी वाई नगरपालिकेच्यावतीने माजी नगराध्यक्ष अनिल सावंत व सहकारी नगरसेवकांनी अजित पवार यांचा सत्कार केला. प्रमोद शिंदे, अनिल सावंत, बाबुराव संकपाळ यांनी स्वागत केले. नितीन भुरगुडे पाटील यांनी प्रास्ताविक केले. विठ्ठल माने यांनी सूत्रसंचालन केले.
अजितदादांनी केले सुरज चव्हाणचे अभिनंदन
गरीब घरातील तरुणाने आपल्या कलेच्या माध्यमातून बिग बॉस कार्यक्रमामध्ये विजेता हाेण्याचा बहुमान मिळवला आहे.
गरीब कुटुंबातील या युवकाने आपल्या काॅमेडी रिल्समधून महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्यावर राज्य केले. त्याचे मी अभिनंदन करताे व पुढील वाटचालीस त्याला शुभेच्छा देताे, असे ही अजित पवार यांनी सांगितले.





