पुणे – महापालिकेने विविध कारणांसाठी महावितरणला 1964 पासून भाडेकराराने जागा दिल्या आहेत. या जागा अतिशय अल्प दराने दिल्या आहेत. अनेक जागांचे भाडेकरारही संपले आहेत. त्यामुळे या जागा परत द्याव्यात, अथवा सुधारित जागा वाटप नियमावली 2008 नुसार भाडे द्यावे, असे पत्रच महापालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाने महावितरणला दिले आहे.
पालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, 78 हजार 585 फूट जागा महापालिकेने महावितरणला दिली आहे. महावितरणला कार्यालय तसेच वेगवेगळ्या कामांसाठी त्यांच्या मागणीनुसार, जागा देण्यात येतात. 1964 पासून या जागा देण्यात आल्याची नोंद पालिकेकडे आहे. या जागांसाठी तत्कालिन दरानुसार, महापालिका भाडे आकारणी करत आहे. मात्र, ही रक्कम अत्यल्प आहे. तर अनेक जागांचे करार संपून 20 ते 25 वर्षे झाली असून, हे करार नव्याने झालेले नाहीत. गेल्या काही काळात महापालिकेचे आर्थिक उत्पन्न घटले आहे.
त्यामुळे मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडे प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. त्याचे नियोजन सुरू असतानाच ही बाब समोर आल्याने महापालिकेने महावितरणला पत्र पाठवून तातडीनं याबाबतची प्रक्रीया सुरू करण्यासाठी संयुक्त बैठक घेण्याच्या सूचना केल्या आहेत.
दरम्यान, या जागांचे सुमारे 2 लाख 80 हजार रुपयांचे भाडेही थकीत असून ते तातडीने भरण्याच्या सूचना पत्रात केल्याची माहिती मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त राजेंद्र मुठे यांनी दिली.